अमृतसर – पाकिस्तानातील मुलीसोबत भारतीय तरुणाला प्रेम होणे. दोघांनी विवाह करण्याचे ठरविणे. पण दोन देशांमधील राजकीय शतृत्व आडवे येणे, ही एखाद्या चित्रपटाची कथा वाटत असली तरीही अश्या घटना प्रत्यक्षात बरेचदा घडत असतात.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरुणीचा एका भारतीय तरुणावर जीव जडला. पण प्रत्यक्ष भेटीत नाही तर सोशल मिडीयावर. त्यामुळे फेसबुकवर त्याचा माहोल झाला. मग लग्नापर्यंत विषय गेला. दोघांची कधी भेट झाली नाही तरीही एकमेकांना लग्नाचे वचन दिले. पण शेवटी तेच घडले जे आपण सिनेमात बघत आलोय. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अडचणी पुढे आल्या. पाकिस्तानी तरुणीने धाडस केले आणि थेट भारत सरकारला प्रियकराशी भेटण्याकरिता व्हिसा हवा म्हणून विनंती केली.
विशेष म्हणजे भारत सरकारनेही या तरुणीला लग्नासाठी व्हिसा जारी केला आहे. लाहोरमध्ये राहणारी सुमन शिक्षिका आहे. तर अमित हा हरगोविंदपूरचा रहिवासी आहे. आंतरराष्ट्रीय सीमेचा प्रश्न असला तरीही दोन्ही देशांमधील कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिला होता. मात्र भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्यामुळे प्रकरण थांबले. दोन्ही कुटुंबांमध्ये निराशेचे वातावरण होते. अश्यात पाकिस्तानात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला व्हिसा मिळावा म्हणून तरुणाने प्रयत्न सुरू केले. अखेर भारताने पाकिस्तानी तरुणीला व्हिसा जारी केला.
मकबूलची मदत
2003 मध्ये मकबूल नावाच्या तरुणाला फैसलाबादमधील ताहिरा हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली होती. हे प्रकरणही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते. मकबूलनेच सुमन आणि अमितला मदत केली. आता सुमन, तिचे आई-वडील आणि काही नातेवाईकांना भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यात आला आहे. सुमनने यासाठी भारत सरकारचे आभार मानले आहे. पाकिस्तानात जाऊन लग्न करण्याची अमितची इच्छा आहे. त्यासाठी त्याने पाकिस्तान दुतावासातही अर्ज केला आहे.