नाशिक – आपली त्वचा आणि केस तजेलदार, मुलायम, कोमल असावे असं प्रत्येकाला वाटते. पण उन्हाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या डोकं वर काढतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. अशावेळी कॉस्मेटिक्स, केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्यापेक्षा आयुर्वेदानुसार घरच्या घरी आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेऊ शकतो, असे मत सौंदर्यशास्त्र अभ्यासक डॉ. वर्षा चित्तीवाड यांनी सांगितले.
इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. त्वचेच्या आणि केसांच्या समस्येविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांमध्ये प्रचंड घाम येणे, अतिउष्णतेमुळे त्वचेचे तापमान वाढणे, तैलग्रंथी मोठ्या होतात त्यामुळे तेल जास्त स्रवते. धूळ, प्रदूषण यामुळे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. मुरुमे, पुटकुळ्या येतात. तसेच प्रखर उन्हामुळे त्वचा रापते, काळवंडते, काळे डाग पडतात. त्वचेप्रमाणेच केस कोरडे होतात, तैलग्रंथी नैसर्गिकपणे काम करणे बंद करतात. त्यामुळे कोंडा होणे, केस गळणे, तुटणे, अकाली पांढरे होणे, केसात फोड येणे अशा समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात जास्त काळ उन्हात फिरणे, पंखा आणि एसीच्या हवेत अधिक काळ बसणे, अतिरिक्त केमिकल्सचा वापर यामुळे त्वचा आणि केस कोरडे पडतात. अशावेळी बाह्य उपचारांबरोबर अंतर्गत उपचारांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उन्हाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या काळजीसाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त तेलकट, मसालेदार, तिखट, आंबट, खारट पदार्थ खाण्याऐवजी द्रवरूप पदार्थ घेतले पाहिजे. त्यात प्रामुख्याने ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळपाणी, जलजीरा यांचा वापर अधिक करावा. अनियमित आहार, अति उपवास, उष्ण पदार्थ याचा सुद्धा त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. बाह्य उपचारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, त्वचा ऑईली असो वा कोरडी घरच्या घरी आपण त्वचेची काळजी घेऊ शकतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काही गोष्टी आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्या पाहिजे. सकाळी उठल्यावर साबण वापरण्यापेक्षा कच्च दूध त्यात लिंबू किंवा संत्र्याचा रस मिसळून ५ मिनिटे चेहऱ्यावर मालिश करावी. त्यानंतर अंघोळ करताना पाण्यात गुलाब किंवा मोगऱ्याच्या पाकळ्या टाकाव्यात. आंघोळीनंतर चेहऱ्यावर कोरफड जेल आणि टोनर म्हणून काकडीचा रस लावू शकतो. रात्री झोपताना मुगाच्या किंवा डाळीच्या पिठात दही मिसळून चेहऱ्यावर लावले तर चेहरा स्वच्छ होतो. बाहेर जाताना दिवसभर गुलाबपाण्याचा स्प्रे जवळ ठेवावा आणि तो शिंपडावा त्यामुळे थंडावा मिळतो. तजेला मिळतो. त्वचा कोरडी असेल तर रात्री चेहऱ्याला खोबरेल किंवा तिळाचे तेल लावावे. केस धुताना शाम्पूचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक शिकेकाई, आवळा पावडर, रिठा, मेहंदी यांचा वापर करावा.
उन्हाळ्यात बाहेर जाताना त्वचेचे प्रखर सूर्यप्रकाशापासून रक्षण करणे आवश्यक आहे. सकाळी ८ पर्यंत कोवळा सूर्यप्रकाश असतो पण त्यानंतर प्रखर ऊन येते. आणि त्याचा त्रास होतो. अशावेळी बाहेर जाताना किमान ५० spf असलेले चांगल्या ब्रँडचे सनस्क्रीन लोशन लावावे. केसांसाठी आणि त्वचेसाठी कॉटन स्कार्फ गरजेचा आहे. त्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश येत नाही. डोळ्यांची त्वचा नाजूक असते त्यामुळे चांगला गॉगल वापरावा. उन्हाळ्यात कमीत कमी मेकअप करावा. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये सांगितलेली ऋतुचर्या आपण पाळली तर आरोग्य व्यवस्थित राहील. आपल्या अंतर्गत आरोग्याचा आरसा म्हणजे आपली त्वचा. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्याकडे आपण लक्ष देणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
ही संपूर्ण मुलाखत फेसबुक लाईव्हवर बघा…https://fb.watch/co_CiY85WC/