या बुलेटीनचे सदस्य झाल्यास (त्यासाठी फेसबुक किती पैसे आकारले ते कळले नाही) लेखकाला त्याची स्वतंत्र वेबसाईट तयार करून मिळेल, शिवाय त्याच्या प्रकाशनाचे नाव, लोगो आणि रंगसंगती हवी तशी करून मिळेल. त्यांच्या लेखनात ते ऑडिओ, व्हिडिओ, चित्र सगळं काही वापरू शकतात. ”एखाद्या विषयातील तज्ञ त्याच्या विषयात सखोल लेखन करत असला तर ते येथे वाचायला मिळावे हा आमचा हेतू आहे. लेखकाला पॉडकास्ट आणि Live Audio Rooms यांचा वापर करता येईल. फेसबुक हा सारा कंटेंट त्यांच्या फेसबुक न्यूज आणि इतर प्लॅटफॉर्मवर वापरेल ज्यांना तो वाचायचा किंवा ऐकायचा आहे त्यांच्याकडून फेसबुक पैसे घेईल. हा कन्टेन्ट फेसबुक पेजेसशीही कनेक्ट करता येईल.”’ असे फेसबुकने म्हटले आहे. म्हणजेच फेसबुक बुलेटिनचा मजकूर सर्व Multi -Media प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
या सगळ्याचा लेखकाला कसा फायदा होतो ते बघावे लागेल. तो अर्थातच त्याचा मजकूर वाचायला येणाऱ्या वाचकांकडून पैसे घेणार किंवा कसे, त्यातला फेसबुकचा हिस्सा किती वगैरे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु हे मॉडेल लेखन क्षेत्रात क्रांती घडवेल असे फेसबुकला वाटते. आज अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईट्सवर चांगले साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. सर्व भाषांमधील वर्तमानपत्रे व मासिके कधी वाचकांकडून जास्त पैसे घेऊन तर काहीवेळा फुकट चांगला मजकूर वाचायची सोय वाचकाला उपलब्ध करून देतात. पण फेसबुक बुलेटिन कसे निघते ते पाहणे मनोरंजक ठरेल.
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या ब्लॉगवरुन साभार)