नाशिक – कोविडमुळे शिक्षण क्षेत्रात खूप बदल झाला. सध्याच्या ऑनलाइन ऑफलाइनच्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत, भीती, दडपण आहे. अशावेळी शिक्षकांप्रमाणेच पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. कारण सध्याच्या काळात विद्यार्थी घरी पालकांसोबत अधिक असतात अशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांचे मित्र होऊन त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजे. त्यांच्या मनातली भीती काढून चांगल्या गोष्टींसाठी त्यांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे, अस मत नाशिकच्या रंगुबाई जुन्नरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदा पेटकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या क्षमतेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आजचे विद्यार्थी हे प्रचंड हुशार आहेत. टेक्नोसॅव्ही असल्याने ऑनलाइन शाळेशी त्यांनी पटकन जुळवून घेतले. या काळात अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने व्हिडीओ बनवणे, पीपीटी तयार करणे, झूम क्लास या गोष्टी शिकल्या. आज विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रलोभने आहेत, बाहेर प्रचंड स्पर्धा आहे अशावेळी त्यांची क्षमता ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की सध्या बोर्डाने परीक्षेचा वेळ वाढवून दिला आहे. काही कारणाने परीक्षेला यायला जमले नाही तर काही काळाने परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पण कोविडची ही परिस्थिती काही काळाने बदलेल. पुन्हा सगळं पूर्वपदावर येईल. आणि आता विद्यार्थ्यांची लिखाणाची, ऐकण्याची, सवय कमी झाली आहे. पूर्णवेळ घरी असल्याने अनेक विद्यार्थी एकलकोंडे झाले आहेत. मनातलं व्यक्त करत नाहीत. मध्यंतरी ऑफलाइन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमधला हा बदल मोठ्या प्रमाणावर जाणवला. त्यांना बोलतं करण्याची मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांवर होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. तीन तास बसून लिखाणाची सवय गेली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, श्रवण आणि संवाद या कौशल्यांवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी पालक आणि शिक्षका दोघांनी प्रयत्न केले पाहिजे. सध्याच्या या बदललेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांचे समुपदेशनही आम्ही करतो, आणि ती सध्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्क्रीन टाइमविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ऑनलाइन शाळा आणि क्लासमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. पालकांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शाळेनंतर गेम, व्हिडीओ यासाठी मोबाईल देऊ नये. त्याऐवजी मुलांना वाचनाकडे वळवावे. त्यांच्यासोबत बसून गप्पा मारणं, चर्चा करण, वाचन करणं आवश्यक आहे. आपली मुलं फोनवर नक्की काय करतात, कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवले पाहिजे. याविषयी पालक आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद होणंही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेविषयीची भीती काढताना त्यांनी सांगितले की, घाबरू नका, प्रामाणिक प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा, आहे त्या परिस्थितीतवर मात करून पुढे जायचं आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास ही गुरुकिल्ली लक्षात ठेवा आणि पुढे जा. समस्या अनेक येतील पण प्रत्येक समस्या ही मार्ग घेऊनच येते, तो मार्ग सापडला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑफलाइन परीक्षाच उत्तम आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.
ही सर्व मुलाखत फेसबुकच्या या लिंकावर बघा
https://fb.watch/aYBSHVr9ax