इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ही माध्यमं आजच्या काळात रोजच्या वापरातील झाली आहेत. पण ती वापरण्यातच अडचणी येत असल्याने युजर्समध्ये नाराजी पसरली आहे. सकाळच्या सुमारास हे तिन्ही अॅप डाऊन असल्याने युजर्सला त्यात अपडेटस मिळत नव्हते.
डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मेटा कंपनीच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यात अडचणी येत आहेत. युजर्स ट्विटरवर ट्विट करत आपला राग व्यक्त करत आहेत. ट्विटरवर #Facebook , #Instagram , #WhatsApp , #FacebookDown असे हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत. अद्याप डाऊन होण्याच्या समस्येचं कारण स्पष्ट झालेले नाही. ही समस्या मेटाच्या सर्व्हरशी किंवा ॲपमध्ये असलेल्या डिव्हाईसशी संबंधित असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः आयफोन युजर्सला मेटा कंपनीच्या मालकीच्या या सोशल मीडिया ॲप वापरण्यात अडचण येत आहे. शिवाय, ही सेवा तात्पुरती उपलब्ध नाही असा संदेशदेखील मोबाईलवर मिळत आहे.
कोणत्याही समस्येला वाचा फोडण्यासाठी ट्विटर या माध्यमाचा वापर केला जातो. आताही युजर्स आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटर या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. एका व्यक्तीने ट्विटरवर विचारले, कोणाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात अडचण येत आहे का? यावर दुसऱ्या युजरने ट्विट करत फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ऑल डाऊन असल्याचं सांगितलं.
यापूर्वी १९ एप्रिल रोजी इंस्टाग्राम जागतिक स्तरावर डाऊन झाले होते. त्यावेळी बहुतेक युजर्सना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाण्यात अडथळे येत होते किंवा फीड रिफ्रेश करता येत नव्हतं. त्यावेळीही यूजर्सने आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटरची मदत घेतली होती. काही काळाने ही समस्या सुटली होती. मात्र आता पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागत असल्याने युजर्सने नाराजी व्यक्त केली.