नवी दिल्ली – प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा शुक्रवारी मध्यरात्री सर्व्हर डाऊन झाल्याने पुन्हा एकदा बंद झाली होती. त्यामुळे युजर्सना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागला. कंपनीतर्फे तातडीने पावले उचलून सेवा पूर्ववत करण्यात आली. सोमवारच्या समस्येशी या समस्येचा संबंध नाही, असे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फेसबुकने एक निवेदन जारी करून युजर्सची माफी मागितली आहे. कन्फ्युगरेशन बदलल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. परंतु आता ती व्यवस्थित पूर्ववत झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच आठवड्यात सोमवारी सात तास फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम सेवा ठप्प झाल्याने युजर्सना समस्यांचा सामना करावा लागला होता.
इंटरनेटवर देखरेख ठेवणार्या Downdetector या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या वेळी आउटेजची समस्या जगातील काही युजर्सना करावा लागला आहे. शुक्रवारी ३६ हजारांहून अधिक युजर्सना इन्स्टाग्रामवर समस्या निर्माण झाली. फेसबुकवरही ८०० हून अधिक युजर्सनी फेसबुक काम करत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सेवा खंडित झाल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामने युजर्सची माफी मागून दोन्ही टीम लवकरच समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.