नवी दिल्ली – येथील एका माजी आमदाराच्या तरूण मुलाची फेसबुकवर एका तरूणीशी मैत्री झाली, त्यानंतर या मुलीने त्याला चक्क ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्या तरुणीने या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. त्या मुलीला पैसे दिले, पण जेव्हा तिच्या मागण्या वाढू लागल्या तेव्हा त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
पीडित मुलाच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. हा मुलगा दक्षिण-पूर्व दिल्लीत आपल्या कुटूंबासह राहत असून त्यांचे वडील दोन वेळा दिल्लीहून आमदार राहिले आहेत. यासंबंधी त्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३० मार्चच्या रात्री एका तरूणीने तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट (मैत्रीची विनंती) पाठविली. त्याला स्वीकारत मॅसेज पाठविणे सुरू केले. त्यानंतर दोघे फेसबुकवर मित्रही झाले. आणि काही गोष्टी घडू लागल्या.
सदर मुलाचे अश्लील फोटो आपल्याकडे असल्याचे त्या तरूणीने सांगितले. तसेच आणखी पैसे दे अन्यथा ती त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे फोटो पाठवते, असे धमकावू लागली. अखेर त्याने ७० हजार रुपये तिला दिले. तरीही आरोपी तरूणी पैसे घेऊन त्याला धमकावत राहिली. एकदा तर पाच लाख रुपये दे, अन्यथा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देऊ लागली. अखेर घाबरून त्याने पोलिसात या प्रकरणाची तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलिसांबरोबरच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलची टीमही तैनात करण्यात आली आहे.