अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लवकरच फेसबुकचे अनेक अनोखे आणि उपयुक्त फिचर्स बंद होणार आहेत. फेसबुकच्या नियरबाय फ्रेंड्स या फिचरमुळे लोकांना ते कुठे आहेत हे आपल्या फेसबुक परिवारासोबत शेअर करता येते. ते यावर्षी ३१ मे पासून बंद होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युझर्सच्या अहवालांनुसार, कंपनीने युझर्सना नियरबाय फ्रेंड्स फिचर आणि इतर स्थान-आधारित फिचर्स बंद करण्याबद्दल सूचित करणे सुरू केले आहे.
नियरबाय फ्रेंड्स या फिचरमुळे मित्रांचे रिअल टाइम स्थान ट्रॅक करण्यास मदतीचे आहे. जिथे आपण आहोत तिथला हवामान अंदाज, आपत्ती, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशन ही सगळी माहिती उपलब्ध होते. पण आता हे सगळं बंद होणार आहे. ट्विटरवर अनेकांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच फेसबुकने स्वतः फेसबुक अॅपवरील सूचनेद्वारे फ्रेंड्स निअरबाय फिचर बंद करण्याची घोषणा केली आहे. यूजर्सना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये कंपनीने म्हटले आहे की, हे फीचर, जे युझर्सला जवळपास कोणते मित्र आहेत किंवा प्रवासात आहेत हे शोधण्यात मदत करते ते ३१ मे २०२२पासून आता उपलब्ध होणार नाही. शिवाय, हवामान सूचना, स्थान इतिहास आणि पार्श्वभूमी स्थानासह इतर स्थान-आधारित कार्येदेखील प्लॅटफॉर्मवरून नाहीशी करण्यात येणार आहेत. कंपनीने या वर्षी वापरकर्त्यांना लोकेशन हिस्ट्रीसह त्यांचा डेटा डाउनलोड करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर ते काढले जाईल. तथापि, फेसबुकने स्पष्ट केले आहे की ते इतर अनुभवांसाठी युझर्सच्या स्थानाची माहिती गोळा करणे सुरू ठेवेल.
फेसबुकने २०१४ मध्ये iOS आणि Android या दोन्हींवर नियरबाय फ्रेंड्स फिचर लाँच केले होते. फेसबुकवर असलेल्या आपल्या मित्रांपैकी आपल्याजवळ कोण आहे हा त्यामागचा उददेश होता. ही सुविधा वापरायची की नाही ह त्या व्यक्तीवर सोपवण्यात आलं होतं. तसेच, तुमचे मित्र कधी प्रवास करत आहेत हेदेखील पाहता येत होते.