मुंबई – एका सोशल मीडिया मंचापेक्षा पुढे जाऊन फेसबुक आता मेटावर्स कंपनी होणार आहे, अशी घोषणा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गेल्या महिन्यात केली होती. मेटावर्स बनविण्यासाठी कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची गरज भासणार आहे. मेटावर्सच्या निर्माणासाठी दहा हजार उमेदवारांची नियुक्ती करण्याची घोषणा फेसबुकने केली आहे.
फेसबुक आपल्या वास्तविक आणि व्हर्च्युअल जगातील अनुभवासाठी पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करणार आहे. या भरती मोहिमेत फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, नेदरलँड, पोलंड आणि स्पेनसह इतर देशात उमेदवारांना कामावर घेतले जाईल. युरोपीय तांत्रिक क्षेत्रात विश्वास निर्माण झाल्याने हे पाऊल उचलले असून, निश्चितरूपाने ग्राहक हाच मोठा आधार आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.
फेसबुकचे पूर्वीपासूनच कॉर्क, आयर्लंडमध्ये एक रिएलिटी लॅब्सचे कार्यालय आहे. फेसबुकने फ्रान्समध्येही एक एआय संशोधन प्रयोगशाळा उघडली आहे. २०१९ मध्ये फेसबुकने एआय नैतिक संशोधन केंद्र तयार करण्यासाठी म्युनिख येथील तांत्रिक विद्यापीठासोबत एक करार केला होता. फेसबुककडून अनेक नोकर्यांची घोषणा करणे हा एक जनसंपर्क वाढविण्यासह व्यावसायिक गुंतवणूक करण्याचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
जर एखाद्या व्यक्तीने अॅपल, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा जास्त अभ्यास केला तर तांत्रिक प्रगती अपरिहार्य आहे हे त्याला निश्चित कळेल. मेटावर्स याच श्रेणीमध्ये असेल. फेसबुकचे मेटावर्स स्वरूप नागरिक आणि समाजांमधील एकमेकांमधील संबंधांची क्षमता वाढवू शकते. मेटावर्सचा विचार भौतिक जगातील अडथळे पार करण्याच्या असीम शक्यतांना जन्म देतो, असे सांगण्यात आले आहे.