नवी दिल्ली – फेसबुक या प्रसिद्ध सोशल मीडिया संकेतस्थळ प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते आणि सामान्य लोकांमध्ये भेदभाव करत आहे. प्रसिद्ध लोक, सेलिब्रिटींना फेसबुकने आपल्याच नियमांतून सवलत दिली आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गुणवत्ता जपण्यासाठी फेसबुकने सुरू केलेल्या एका कार्यक्रमांतर्गत अनेक प्रसिद्ध व्यक्तींना नियमातून सवलत दिली आहे. क्रॉस चेक नावाने सुरू केलेल्या कार्यक्रमांतर्गत फेसबुक वापरणा-या मोठ्या लोकांना त्या नियमातून सवलत दिली असून, सामान्य लोकांना मात्र ते नियम कठोरतेने लागू करण्यात आले आहेत.
फेसबुक प्रवक्ते अँडी स्टोन यांनी क्रॉस चेक कार्यक्रमाचे ट्विटरवर समर्थन करताना नियमांना लागू करण्याची प्रक्रिया अचूक नसल्याचे म्हटले आहे. स्टोन म्हणाले, की न्याय देण्याच्या दोन व्यवस्था नाहीत. चुकांविरुद्ध एक सुरक्षाकवच तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नियमांची अंमलबजावणी अचूक नसेल. तसेच गती आणि शुद्धतेत कमी-अधिक प्रमाण असू शकते. वॉल स्ट्रीट जर्नलने काही प्रसिद्ध लोकांनी शेअर केलेल्या पोस्टचा हवाला दिला आहे. त्यामध्ये फुटबॉल खेळाडू नेमार याची एक पोस्ट आहे. त्यात त्याने एका नग्न महिलेचा फोटो शेअर केला आहे. संबंधित महिलेने नेमारवर बलात्काराचा आरोप लावला होता.
फेसबुकवर काय पोस्ट करावे आणि करू नये याबाबतच्या वादांचा निपटारा करण्यासाठी एका स्वतंत्र मंडळाची स्थापना केली आहे. कन्टेंट मॉडरेशनबाबत दुटप्पी धोरण अवलंबिले जात नाही, असे फेसबुकने मंडळाला सांगितले आहे. मंडळाचे प्रवक्ते जॉन टेलर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले, की फेसबुकच्या कन्टेंट मॉडरेशनच्या प्रक्रियेत पारदर्शकतेच्या कमतरतेबाबत मंडळाने अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. काही प्रसिद्ध लोकांना व्हाइट लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना नियम लागू करण्याची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच वादग्रस्त कन्टेंटचा आढावा घेतला जात नाही.