मुझफ्फरपूर (बिहार) – मानवी जीवनात डोळा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो, आजच्या काळात मोबाइल आणि टीव्हीमुळे डोळ्यासंबंधी अनेक नवनवीन आजार उद्भवत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे तर वयोमानानुसार डोळ्याचे ऑपरेशन करावे लागते. यासाठी ऑपरेशन करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. काही वेळा निष्काळजीपणा झाला किंवा दुर्लक्ष झाले तर डोळे जाण्याची देखील वेळ येऊ शकते
बिहारच्या मुझफ्फरपूर नेत्र रूग्णालयात २६ जणांची दृष्टी गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. एका ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्या मुझफ्फरपूर आय हॉस्पिटलमध्ये पीडितांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पट्टी उघडल्यानंतर त्याला काहीच दिसले नाही. याबाबत सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार आल्याने हा प्रकार उघडकीस आला. गंभीर संसर्ग झालेल्या १५ रुग्णांना पाटण्यात पाठवण्यात आले आहे.
सिव्हिल सर्जन डॉ. विनय कुमार शर्मा यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयात एकाच तारखेला एकूण ६० रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. होती त्यापैकी अनेकांना त्रास झाला असून ६ रुग्णांना एसकेएमसीएचमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाटण्यात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
दृष्टी गेल्याने पीडित कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. नातेवाईकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले. यानंतर डोळ्यांमध्ये वेदना आणि अस्वस्थता वाढली. अनेक रुग्णांना त्यांचे डोळे काढण्याची सूचनाही करण्यात आली. पाटणा येथील दृष्टीपुंज हॉस्पिटलचे संचालक डॉ सत्यप्रकाश तिवारी यांनी सांगितले की, मुझफ्फरपूर येथून १५ रुग्ण येथे आले होते. या सगळ्यांची अवस्था फारच वाईट होती. असे असतानाही काहींवर शस्त्रक्रिया तर काहींना औषधे व इंजेक्शन देण्यात आले. त्यांना पुन्हा बोलावण्यात आले, मात्र ते सोमवारपर्यंत येथे आले नाही. अशा परिस्थितीत त्याची दृष्टी परत येईल की नाही हे सांगणे कठीण आहे.
सिव्हिल सर्जनला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रणव कुमार यांनी सांगितले. नेत्र रुग्णालयाचे सचिव दिलीप जालान यांनी सांगितले की, ऑपरेशननंतर पाच-सहा रुग्णांची दृष्टी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या संसर्ग खोलवर असल्याने सहा डोळे काढावे लागतील. काही रुग्ण चांगल्या उपचारासाठी पाटण्याला गेले होते. त्यापैकी अनेकजण परतले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.