नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, विशेषतः कोविड 19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक निर्बंध असतानाही, भारताने एप्रिल – जून (2021-22) कालावधीत कृषी उत्पादन व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांच्या निर्यातीत गेल्या 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 44.3% इतकी विक्रमी वाढ नोंदवली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी उत्पादन व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांच्या निर्यातीतील ही मोठी झेप गेल्या आर्थिक वर्षातील (2020-21) निर्यातवाढीशी सुसंगत आहे.
2019 मधील 37 अब्ज डॉलर्सच्या कृषी निर्यातीला डोळ्यासमोर ठेवून जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आखलेल्या व्यापार आराखड्यात भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर 9वा आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न निर्यात विकास प्राधिकरणाने ( APEDA ) महामारीचा प्रकोप सर्वात जास्त असतानाही हे उद्दिष्ट गाठण्यास देशाला सहायय केले. वाणिज्यिक माहिती व सांख्यिकी संचालनालयाने दिलेल्या अंदाजानुसार APEDA उत्पादनांची ची एकूण निर्यात एप्रिल ते जून 2021 च्या तिमाहीत गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत 44.3 टक्क्यांनी वाढली आहे.
APEDA यादीतील उत्पादनांच्या एकूण निर्यातीत एप्रिल – जून (2020-21) या कालावधीतील 3338. 5 दशलक्ष डॉलर च्या तुलनेत एप्रिल – जून (2021-22) या कालावधीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच 4817. 9 दशलक्ष डॉलर्स पर्यंत वाढ झाली आहे. भारताच्या कृषी निर्यातीने आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत डॉलर्स मधील गणनेत 25.02 टक्के तर रुपयांमधील गणनेत 29.43 टक्के वाढ नोंदवली होती. चालू आर्थिक वर्ष (2021-22) मध्येही कृषी निर्यातीत 15 टक्के वाढ अपेक्षित आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार ताजी फळे व भाज्यांच्या निर्यातीत 9.1 टक्के वाढ, तर प्रक्रियाकृत खाद्यान्नाच्या निर्यातीत 69.6 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
एप्रिल ते जून 2020-21 मध्ये ताजी फळे व भाज्यांची निर्यात 584.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, ती वाढून एप्रिल ते जून 2021-22 मध्ये 637. 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने इतर अन्नधान्यांच्या निर्यातीत 415. 5 टक्के इतकी मोठी वाढ केली असून मांस , दुग्धजन्य तसेच पोल्ट्री उत्पादनाच्या निर्यातीत 111.5 टक्के वाढ नोंदवली आहे. एप्रिल ते जून 2020 दरम्यान इतर अन्नधान्यांची निर्यात 44.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, ती एप्रिल ते जून 2021 मध्ये वाढून 231. 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स झाली. एप्रिल ते जून 2020 दरम्यान मांस , दुग्धजन्य तसेच पोल्ट्री उत्पादनाची निर्यात 438. 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती ती एप्रिल ते जून 2021 दरम्यान वाढून 1022. 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वर पोचली आहे. तांदळाच्या निर्यातीत 25.3 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते जून 2020 च्या दरम्यान ती 1914. 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, ती एप्रिल ते जून 2021 दरम्यान वाढून 2398. 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढली आहे.