इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. वॉर्ड बॉयने एक्सपायरी डेटचे इंजेक्शन दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व खासदार प्रतिनिधी आल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी निष्काळजी फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि वॉर्ड बॉय यांना निलंबित केले आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासनही देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा येथील बडौसा पोलीस ठाण्यातील जमुनिहापुरवा येथील रहिवासी धनेश कुमार श्रीवासव यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीची प्रकृती रविवारी बिघडली होती. नातेवाइकांनी दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. हरिश्चंद्र अग्रवाल यांना दाखवले. तिची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याने त्यांनी मुलीला दाखल केले. सायंकाळपर्यंत मुलीवर उपचार सुरू होते. रात्री दहाच्या सुमारास प्रकृतीत सुधारणा झाल्यावर नातेवाईकांनी मुलीला घरी नेले. सोमवारी सकाळी मुलीची प्रकृती पुन्हा खालावल्याने नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले.
रुग्णालयात वॉर्ड बॉयने चिमुकलीला इंजेक्शन दिले. इंजेक्शननंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. हे पाहून नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इंजेक्शनची बाटली पाहिली असता दिसून आले की, ती एक्सपायरी डेट झालेली होती. यामुळे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
जिल्हा रुग्णालयातील गोंधळाची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रप्रकाश खरे आणि खासदार शक्ती प्रताप सिंह तोमर पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच सदरचे आमदार अनिल प्रधान हेही आपल्या समर्थकांसह रुग्णालयात पोहोचले. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. कोतवाली प्रभारी अवधेश कुमार मिश्रा यांनी फौजफाटा घेऊन परिस्थिती हाताळली. सीएमएस डॉ. सुधीर शर्मा यांनी फार्मासिस्ट धर्मेंद्र मिश्रा, स्टाफ नर्स कुलदीप कुमार आणि वॉर्ड बॉय अवधेश कुमार यांना प्रथमदर्शनी दोषी मानून निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून डॉक्टरही दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
Expiry Date Injection Minor Girl Death
Uttar Pradesh Chitrakoot Health Government Hospital