मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. एक्झिट पोलच्या निकालांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत असतो. उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा बहुमत सिद्ध करेल आणि पंजाबमध्ये सत्तांतर होऊन आम आदमी पक्षाला चाल मिळेल, असे निकाल एक्झिट पोलने दिले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन्ही राज्यात २०१७च्या निवडणुकीतही एक्झिट पोलचे निकाल होते, ते खरे ठरले का हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेश
२०१७ रोजी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान वेगवेगळे एक्झिट पोलचे अंदाज लावण्यात आले होते. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील आणि तो मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
१) सी व्होटर, न्यूज एक्स एम आर सी आणि एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असे सांगण्यात आले होते. सी व्होटरतर्फे त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यात भाजप १६१ जागा, काँग्रेस-सपा आघाडीला १४१ जागा, बसपाला ८७ आणि इतर १४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
२) टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप २१० ते २३० जागा मिळवून बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा करण्यात आला होता. समाजवादी पार्टीला ११० ते १३० जागा, बसपाला ६७ ते ७४ जागा तसेच इतरांना ८ जागा मिळण्याचा अंदाज दाखवण्यात आला होता.
३) एबीपी न्यूजच्या एक्झिटपोलमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला होता. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही सांगण्यात आले होते. या एक्झिट पोलमध्ये भाजपला १६४-१७६, एसपी-काँग्रेसला १५६-१६९, बसपाला ६०-७२, इतर २-६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
४) न्यूज एक्स-एमआरसीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला १८५, एसपी-काँग्रेसला १२०, बसपाला ९० जागा मिळण्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही सांगण्यात आले होते.
पंजाब
पंजाबमध्ये २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये चुरशीची लढत झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यात आम आदमी पार्टी सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु पंजाबमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने काय अंदाज वर्तविले होते, ते पाहूया.
१) २०१७ सालच्या निवडणुकीनंतरच्या सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी ६३ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल असे सांगण्यात आले होते. तत्कालीन सत्ताधारी अकाली दल युतीला फक्त २१.४ टक्के मते मिळवून पहिल्या स्थानावर तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहील असे सांगण्यात आले होते. परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने बाजी मारली आणि कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्री झाले होते.
२) एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणामध्ये पंजाबमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, परंतु बहुमत मिळवण्यात अपयशी ठरेल असा अंदाज दाखविण्यात आला होता. काँग्रेसला ४६-४५ जागा, आपला ४६-४६ जागा, अकाली दल युतीला १९-२७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
३) एबीपी न्यूजशिवाय एक्सिस पोलमध्ये पंजाबमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल असा दावा करण्यात आला होता. काँग्रेसला ६२-७१, आपला ४२-५१, इतर पक्षांना ४-७ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता.