नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांची असलेली नाशिककरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. देशातील अत्यंत महत्त्वाची शहरे येत्या १ मे पासून नाशिकशी विमानसेवेद्वारे कनेक्ट होणार आहेत. आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेटने तशी घोषणा केली आहे.
येत्या १ मे पासून नाशिकहून गोवा, नवी दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या चार प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे स्पाईसजेट कंपनीने जाहीर केले आहे. या विमानसेवेचे बुकींग आता कुठल्याही क्षणी सुरू होण्याची चिन्हे आहेत. स्पाईसजेट कंपनीला उन्हाळी वेळापत्रकात (समर शेड्यूल) या चारही शहरांसाठी विमानसेवेचा स्लॉट उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे एकाचवेळी तब्बल ४ मोठी शहरे नाशिकशी जोडली जाणार आहेत. या सेवेसंदर्भात स्पाईसजेट कंपनीने ओझर विमानतळाची मालकी असलेल्या एचएएल प्रशासनाला तसे कळविले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नाशिकच्या विमानसेवेला ब्रेक लागला. त्यामुळे मोठ्या गतीने सुरू असलेली विमानसेवा अल्प प्रमाणात झाली. सद्यस्थितीत अलायन्स एअर या कंपनीची नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली, नाशिक-पुणे आणि नाशिक-पुणे-बेळगाव या तर स्टार एअर या कंपनीची नाशिक ते बेळगाव ही विमानसेवा सुरू आहे. ट्रुजेट या कंपनीची कंपनीची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवा बंद पडली आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून नाशिक हे राजधानी नवी दिल्ली, आयटी हब असलेले बंगळुरू आणि हैदराबाद, पर्यटनासाठी ख्यात असलेले गोवा, व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले अहमदाबाद या शहरांशी नाशिकची जवळीक वाढणार आहे. अवघ्या काही तासांमध्ये नाशिकहून या शहरात पोहचणे शक्य होणार आहे.