नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंबा हे नाशवंत फळ असल्याने त्याची समुद्रमार्गे निर्यात अतिशय जिकरीची असते. हवाईमार्गे होणारी निर्यात ही अतिशय खर्चिक आहे. मात्र, आता या आव्हानावर मोठा तोडगा काढण्यात आला आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी)ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे आता आंब्याची निर्यात समुद्रमार्गे होऊ शक्य झाली आहे. विशेष म्हणजे, यासाठी नाशिकच्या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे. मुंबईहून एक कंटेनर आंबा अमेरिकेकडे रवाना झाला आहे. हा आंबा नाशिकच्या शेतातला आहे.
नाशिकचे निर्यातदार सानप अॅग्रोअॅनिमल्स या निर्यातदार संस्थेने बीएआरसी सोबत सामंजस्य करार करुन अमेरिकेला आंबा निर्यात करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. कच्चा आंबा साधारण २ आठवड्यांनंतर पिकतो. समुद्रमार्गे निर्यातीत हीच मोठी अडचण आहे. निर्यातीला ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंबा त्या त्या देशातील निकष पूर्ण करण्यात सक्षम ठरत नाही. भारतातून सर्वाधिक निर्यात ही द्राक्षाची होते. भारतात द्राक्षाखालोखाल आंब्याचे उत्पादन होत असले तरी त्याची निर्यात शक्य होत नाही. हवाई मार्गे होणारी निर्यात तअत्यंत महागडी आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन बीएआरसीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की ज्यात कंटेनरद्वारे समुद्रमार्गे होणाऱ्या निर्यातीवेळी आंबा सुरक्षित राहू शकेल.
भारतातून प्रथमच अशा प्रकारची निर्यातीला प्रारंभ झाला आहे. नवी मुंबईतील बीएआरसीच्या विकीरण केंद्राच्या ठिकाणाहून पहिल्या कंटेनरला शुक्रवारी सायंकाळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. याप्रसंगी बीएआरसीचे संचालक डॉ. टी के घंटी, अमेरिकेच्या सुरक्षा अधिकारी डॉ. कॅथरिन फिल्डर, पणन मंडळाचे संचालक सुनिल पवार, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, मुंबई क्वारंटाईन स्टेशनचे उपसंचालक झेड ए अन्सारी, अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर रविंद्र, सानप अॅग्रोअॅनिमल्सचे संचालक शिवाजी सानप, हेमंत सानप, जयंत सानप, वाफा मुंबईचे अध्यक्ष अण्णासाहेब शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिकेतील अनुसया फ्रेश या कंपनीला हा आंबा निर्यात करण्यात आला आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकारी डॉ. कॅथरिन यांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तत्पूर्वी अमेरिकन निकषाप्रमाणे आंब्याची निवड, सुरक्षा पडताळणी, पॅकिंग आदी प्रक्रिया पार पाडण्यात आली.
समुद्रमार्गे आंबा निर्यात हे मोठे आव्हान आहे. मात्र, बीएआरसी, अपेडा, पणन मंडळासह विविध सरकारी संस्थांनी आमच्यावर विश्वास दाखविल्याने आम्हाला आमच्या जबाबदारीची अधिक जाणीव झाली आहे. त्यामुळेच आम्ही देशासाठी हे आव्हान पेलले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर येत्या काळात मोठी क्रांती होणार आहे. कारण, द्राक्षाबरोबरीने भारतातून आंब्याची निर्यात होऊ शकणार आहे. आम्हाला खात्री आहे की हा प्रयोग नक्की यशस्वी होईल.
– हेमंत सानप, संचालक, सानप अॅग्रोअॅनिमल्स