नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी बांधवांचा मोठा आधारवड हरपला आहे. सर्वस्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे. माजी मंत्री माणिकराव गावित यांचे नाशिकमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ल्युकेमिया या आजाराने ते त्रस्त होते. १२ सप्टेंबरला त्यांना उपचारासाठी नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांचावर उद्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन ते सदस्य म्हणून निवडून आलेत. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले. १९८० साली नवापूरचे आमदार झाले.
माणिकराव गावीत हे प्रथमच १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणा-या टॉप टेन खासदारामधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झालेत. १९८१ ते २००९ हा माणिकरावजी गावीत यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
१९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी • संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. १९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. श्रीमती सोनीया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले.
Ex Union Minister Manikrao Gavit Death