नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू वा मित्र नसतो, असे म्हणतात. याची सातत्याने प्रचीती येत राहते. सध्या विविध कारणांवरून काँग्रेस आणि विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर पर्यायाने पंतप्रधन नरेंद्र मोदींविरुद्ध गरळ ओकत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्य असल्याचे म्हणत मोदींचे कौतुक केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपली स्वायत्तता आणि आर्थिक संबंध जपत असताना नव्या जगाची घडी बसविण्याच्या दिशेने भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काढले. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स्प्रेस समूहा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी भविष्याबाबत महत्त्वाचा इशाराही दिला. ‘भवितव्याबाबतचिंतेपेक्षा मला आशा अधिक असली तरी त्यासाठी देशातील सामाजिक सौदार्ह जपणे महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले. २००८ साली जी-२०ची स्थापना झाली, त्यावेळी डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनीच या राष्ट्रगटात देशाचे प्रतिनिधित्व केले.
‘एक्स्प्रेस समुहा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जी-२० अध्यक्षपदारून भारताची कामगिरी, शिखर परिषदेचे आयोजन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची भूमिका आदी मुद्दय़ांवर मनमोकळे भाष्य केले. ‘‘आपल्या हयातीमध्ये भारताकडे चक्राकार पद्धतीचे जी-२० अध्यक्षपद आले आणि शिखर परिषदेचे यजमानपद भारत करत असल्याचे बघायला मिळाले, याचे समाधान आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य देश-चीनमधील तणावामुळे जागतिक परिस्थिती बरीच बदलली आहे. अशा वेळी स्वातंत्र्यापासून टिकलेली शांतताप्रीय लोकशाही आणि वर्धमान अर्थव्यवस्थेमुळे देशाने जगात प्रचंड आदर कमावला आहे,’’ असे सिंग म्हणाले.
भारताची भूमिका योग्यच
जेव्हा दोन मोठ्या देशांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा इतरांवर कुणा एकाची बाजू घेण्याचे दडपण असते. सध्या भारताने आपले सार्वभौमत्व व आर्थिक हितसंबंध जोपासतानाच शांततेचे आवाहन करण्याची भारताची भूमिका योग्य असल्याचेही मनमोहनसिंग यांनी नमूद केले.
EX PM Manmohan Singh on Narendra Modi G20 Summit
Congress BJP Politics