मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. आमदार असताना पदाचा दुरुपयोग करून त्यांनी बेहिशेबी माया जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांच्या घरासह कार्यालयाची १५ तास झडती घेतली असता त्यांच्याकडे कोट्यवधींची माया आढळली आहे.
नरेंद्र मेहता यांच्या ठिकाणांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे ३ कोटींची लेम्बोर्गिनी, तीन आलिशान कार, दीड कोटींचे सोन्या-हिऱ्याचे दागिने आढळले आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधी गुंतवणूकीचे बाँड आणि बँक खाती आढळले आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम करताना त्यांनी १ जानेवारी २००६ ते १ ऑगस्ट २०१५ पर्यंत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ८ कोटी २५ लाख ३१ हजार रुपये इतकी अधिक मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी नवघर पोलीस ठाण्यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.