नवी दिल्ली – कोरोना संकटामध्ये सर्वसामान्यांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. मात्र, याचसंदर्भातील केंद्रीय मंत्री व्ही के सिंग सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत. सिंग हे सध्या गाझियाबादचे खासदार आहेत. सिंग यांनी तासाभरापूर्वी एक ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, “माझ्या भावाला बेड मिळत नाही. गाझियाबादमध्ये एकही बेड शिल्लक नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे”. त्यानंतर सिंग यांचे हे ट्विट संपूर्ण देशभरात प्रचंड व्हायरल झाले. बघा, केंद्रीय मंत्र्याची ही अवस्था तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आला. सोशल मिडियातील या व्हायरल बाबीची दखल सिंग यांनी घेतली आणि त्यांनी ते ट्विट डिलीट केले. तसेच, त्यांनी त्यावर उत्तरादाखल ट्विट केले की,
“तो माझा रक्त्याच्या नात्याचा भाऊ नसला तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून मी, मला आलेले ट्विट जिल्हाधिकाऱ्यांना फॉरवर्ड केले आणि बेडसाठी विनंती केली.” या उत्तरानंतरही सिंग हे ट्रोल होत राहिले. अखेर सिंग यांनी तेही ट्विट डिलीट केले आणि नव्या ट्विटमध्ये म्हटले की, “मला ट्रोल करणाऱ्यांच्या बुद्ध्यांकाने मी अचंबित झालो आहे. माझ्या त्या ट्विटमुळे संबंधितांना बेड मिळाला आहे.”
सिंग यांचे सध्याचे ट्विट आणि त्यापूर्वी केलेल्या डिलीट ट्विटचा स्क्रीनशॉट
https://twitter.com/Gen_VKSingh/status/1383710017291882501