मुंबई – राज्यातील एक कॅबिनेट मंत्री सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्याच्या तसेच त्यांना तैनातीच्या उद्देशाने एक यादी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवत होते. देशमुख यांचे माजी स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या या वक्तव्याचा हवाला देत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
ईडीने न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, देशमुख यांच्या निर्देशांवरून पलांडे हे अनौपचारिक यादी पोलीस स्थापना मंडळाला पाठवत होते. पलांडे यांनी आपल्याविरोधातील मनी लाँड्रिंगचे प्रकरण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ईडीने प्रतिज्ञापत्र सादर केले असून, ईडीने या याचिकेला विरोध केला आहे.
ईडीने दावा केला, की एक मंत्री या यादीसह तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांना भेटत होते. या यादीमध्ये पोलिस अधिकार्यांच्या बदल्या किंवा त्यांच्या तैनातीच्या ठिकाणांच्या नावांचा समावेश होता. या यादीत शिवसेनेच्या आमदारांचे आणि विधान परिषदेच्या सदस्यांची नावेही असत. प्रतिज्ञापत्रानुसार, पलांडे यांनी बार, ऑर्केस्ट्रॉ मालकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी बर्खास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि देशमुख यांच्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
पलांडे यांना याच वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या अटकेच्या तीन महिन्यांनंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते देशमुख यांना मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहेत.