मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांच्या माध्यमातून अनेक खुलासे होऊ लागले आहेत. शंभर कोटींसाठी बैठक झाली होती, अशी माहिती पहिल्याच चौकशीत पलांडे यांनी ईडीला दिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांमध्येही देशमुख यांचाच हात होता, असेही त्यांनी सांगितले आहे.
परमबीर सिंह यांनी ४ मार्चला ज्ञानेश्वरी येथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुखांनी बार मालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला होता. ही बैठक झाली होती की नाही, याबाबत पोलिसांना शंका होती. मात्र ही बैठक झाली होती, अशी स्पष्ट कबुली पलांडे यांनी ईडीपुढे दिली. एकेकाळी देशमुख यांच्या खास माणसांपैकी एक असलेले पलांडेच आता त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देशमुख यांचा हात असल्याचे सांगून पलांडे यांनी तपासाला वेगळे वळण दिले आहे. याशिवाय अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या नावावर एकूण ११ कंपन्या असल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. यात देशमुख यांच्या दोन्ही मुलांचाही समावेश आहे. राबिया लॉजिस्टिक, ब्लॅकस्टोन लॉजिस्टिक, कॉंक्रीट एन्टरप्रायझेस, नॉटिकल वेयरहाऊससिंग, पॅराबोला वेयरहाऊसिंग, बायो नॅचरल ओर्गॅनिक आणि काटोल एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. इतर चार कंपन्यांचा खुलासा अद्याप ईडीपुढे झालेला नाही.
देशमुख यांच्याशी संबंधित एकूण २० कंपन्यांचा तपास सुद्धा सुरू आहे. यातील सात कंपन्यांच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत होती, हे कळल्यानंतर ईडीने नागपूर, अहमदाबाद आणि मुंबईमधील या कंपन्यांवर छापे मारून संचालक आणि सीएंचे बयाण नोंदविले होते. यात देशमुख व त्यांच्या कुटुंबातील लोक या कंपन्या चालवीत होते, असे कबुल करण्यात आले आहे.
चार कंपन्यांचा मालक दाखविण्यात आलेला विक्रम राज शर्मा हा डमी डायरेक्टर होता. त्यानेही देशमुख यांचे सुपूत्र ऋषिकेश देशमुख कंपन्या चालवित होते, असे ईडीला सांगितले आहे. दुसरीकडे सचिन वाझे यानेही बार मालकांकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना दिल्याचे सांगितले आहे.
बोगस कंपन्या
देशमुख यांच्या साई शिक्षण संस्था या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात ४ कोटी १८ लाख रुपयांचे धनादेश जमा झाले. हे सारे पैसे दिल्लीतील काही कंपन्यांच्या माध्यमातून आले. तपासादरम्यान या सर्व कंपन्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले.