विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा आरोप असून त्याची चौकशी सुरू असतानाच त्यांनी पैशांचा अनधिकृतरित्या मोठा व्यवहार केल्याचे पुरावे अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मनी लाँड्रिगच्या आरोपाखाली चौकशीचा फासही आवळला जाऊ शकतो.
अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांच्या कोठडीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एका ट्रस्टला दिल्ली येथील बनावट कंपन्यांनी ४.१८ कोटी रुपये दान दिले आहेत. त्यापूर्वी ही रक्कम कंपन्यांना हवालाद्वारे पाठविण्यात आली होती. मुंबईतील विविध ऑर्केस्ट्रॉ बार मालकांकडून देशमुख यांना हा पैसा मिळाला होता. मुंबई पोलिसातील माजी अधिकारी सचिन वाझे यांनी हा पैसा नंबर -१ (म्हणजेच गृहमंत्री) यांच्याकडे जाईल, असे सांगून वसुली केली होती. गृहमंत्र्यांकडून वसुली करण्यासाठी मुंबईतील बियर बारांची यादीच दिली होती, असे सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले.
दिल्लीत ११ बनावट कंपन्या
वाझे यांनी डिसेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान विविध बार मालकांकडून ४.७० कोटी रुपये वसूल केले होते. देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांना ही रक्कम दोन टप्प्यात दिली. कुंदन शिंदे आणि देशमुख यांचे पुत्र हृषीकेश देशमुख यांच्याद्वारे ही रक्कम दिल्लीतील ११ बनावट कंपन्यांना हवालामार्फत पाठविण्यात आली. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील श्री साई शिक्षण संस्थेच्या ट्रस्टला ४.१८ कोटी रुपये पाठविण्यात आले. ईडीने या ११ बनावट कंपन्यांची पूर्ण माहिती घेतली आहे. दिल्लीतील या कंपन्यांचा कोणताच व्यवसाय सुरू नाही. या कंपन्यांचा वापर फक्त पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो.
दोन सहकारी जाळ्यात
देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख ईडीसमोर मंगळवारी हजर होणार आहेत. ईडीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही, तर अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्धही याच कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
ईडीकडून जबाब नोंदविले
ईडीच्या अधिकार्यांनी पैसे देणार्या बार मालकांचेही जबाब नोंदविले आहेत. तसेच दिल्लीतील त्या कागदी कंपन्यांच्या मालकांचेही जबाब नोंदविले आहेत. २५ जूनला अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांतर्फे चालविल्या जाणार्या सहा कंपन्यांचे संचालक तसेच शेअरधारकांच्या मुंबई, नागपूर, अहमदाबाद आदी सहा ठिकाणांवर छापे मारून अनेक लोकांचे जबाब नोंदविले आहेत. अनधिकृत आर्थिक व्यवहाराबाबत अनिल देशमुख यांचे पुत्र हृषीकेश देशमुख यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. देशमुख यांच्याभोवती चौकशीचा फास आवळल्यानंतर ईडी हृषीकेश देशमुख यांच्यासह इतरांची चौकशीही करू शकते.