मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. त्यातच आता राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडीला) धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणात उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी पोलिस आयुक्त परमीब सिंग यांनी देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून देशमुख यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले असून त्यांच्या मालमत्तेवरही अनेकदा छापे टाकण्यात आले. आता देखील देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये कथित हस्तक्षेप केल्याचा अनिल देशमुखांवर आरोप आहे. या आरोपांबाबत देशमुख यांची चौकशी करणार्या ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीत कुंटे यांच्याकडून मिळालेली माहितीही समाविष्ट केली आहे. देशमुख यांनी कथितरित्या तयार केलेल्या अशाच एका यादीचीही चौकशी सध्या सुरु आहे. त्यातच आता कुंटे यांनी ईडीला जबाब दिला आहे की, अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे. विशेष म्हणजे त्या यादीमध्ये महाराष्ट्रभर नियुक्त केलेल्या १२ पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी अनेकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही ईडीकडून डिसेंबर महिन्यात चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी तब्बल ६ तास चालली होती.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. त्या खात्याचा अधिकारी वाझेनेही वसुलीच्या आरोप केले. यावर आम्ही वारंवार बोलत होतो, मात्र, आता खुद्द त्यावेळचे मुख्य सचिव यांनी सांगितले की गृहमंत्री त्यावेळी बदल्यांची यादी पाठवायचे. याचा अर्थ असा की बदल्यांमध्ये स्वतः गृहमंत्री हस्तक्षेप करत होते. तसेच या प्रकरणी भाजपकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
तत्कालीन गृहमंत्री कथित याद्या पाठवत असत तर त्या नाकारल्या की नाही? असा सवाल उपस्थित होतो. त्यावर कुंटे म्हणतात की, अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने यादीला नाकारत नसल्याचे कुंटे यांनी सांगितले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप तथा दावा केला होता. यापत्रानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरु केली होती. देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तसेच राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर सुनावणी सुरु आहे.