मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. तब्बल वर्षभरानंतर देशमुख हे तुरुंगाबाहेर येणार आहेत. ईडी आणि सीबीआय यांच्यावतीने देशमुख यांची चौकशी सुरू आहे.
देशमुख तुरुंगाबाहेर येणार का
उच्च न्यायालयाने जामीन दिला असला तरी देशमुख यांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. देशमुख अजूनही १० दिवस तरी तुरुंगाबाहेर येणार नाहीत. कारण, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. त्यामुळे किमान १० दिवस तरी देशमुख तुरुंगाबाहेर येणार नाहीत. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सीबीआयच्या याचिकेवर काय निर्णय दिला जातो, यावरच सारे काही अवलंबून असल्याचे विधीज्ञांचे म्हणणे आहे.
EX Home Minister Anil Deshmukh Bail Granted
Legal CBI ED Corruption Mumbai High Court