मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज सकाळीच सक्तवसुली संचानालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. तशी माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मध्यंतरी बऱ्याच काळापासून देशमुख हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. तर, परमबीर सिंग यांनी तर भारतातून पलायन केले आहे. देशमुख यांनी ईडीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर आता देशमुख हे चौकशीसाठी हजर झाले आहेत.
मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे. pic.twitter.com/c7OZ2MY1zS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
देशमुखांशी संबंधित एकाला ठाण्यातून अटक; दलालीचा आहे आरोप
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्था सीबीआयने संतोष जगताप नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या हायप्रोफाइल प्रकरणातील ही पहिली अटक आहे. ठाण्यामधून संतोष जगतापला सकाळी अटक केल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. संतोषविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी झाल्यानंतर तो चौकशीपासून लपत होता.
अधिकारी म्हणाले, सीबीआयने ऑगस्टमध्ये कथित दलाल संतोष जगताप याच्या ठिकाणावर छापा मारून नऊ लाख रुपये जप्त केले होते. माजी मंत्री अनिल देशमुख आणि इतर अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीआयने गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार विरोधी अनिधिनियमाच्या तरतुदीअंतर्गत कपट करून अयोग्य लाभ प्राप्त करण्याच्या प्रयत्नासाठी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख यांनी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला शहरातील बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून एका महिन्यात शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला होता. त्यावर सीबीआयनेसुद्धा अनिल देशमुख यांच्यासह इतर अज्ञान आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.