मुंबई – हॉटेल व बारमालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याचे पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचा आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अटक होण्याची दाट शक्यता आहे. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषीकेश देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. गेल्यावेळी देशमुख हजर झाले नव्हते. त्यांनी वेळ मागितला होता. आता पुन्हा समन्स बजावल्याने ते हजर होणार की त्यांना अटक होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे आरोप केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या दाव्यानुसार अनिल देशमुख यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईतील बारमालकांकडून अंदाजे ४.७० कोटींची वसुली केली आहे. दिल्ली येथील बनावट कंपन्यांच्या मदतीने देशमुख कुटुंबीयांनी ४.१८ कोटी रुपयांचे पैसे खर्च केले. तसेच श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये मिळालेली रक्कम दाखवून काळा पैसा कायदेशीर केल्याचा संशय आहे.
याप्रकरणी ईडीने २५ जूनाल अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी केली होती. देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांचीही ईडीने चौकशी करून अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना समन्स बजावला होता. पण कोरोनाचे कारण सांगून ऑनलाइन चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. चौकशीतून दिलासा मिळावा यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी होणार आहे.