इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सदैव कुठल्या ना कुठल्या तरी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. राज्याचे राज्यापाल म्हणून त्यांनी घालविलेल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांच्या वक्त्यव्यांमुळे वेळोवेळी गदारोळ माजला. आता ते उत्तराखंडला परतले आहेत. मात्र, तिथे दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे शकुनीच्या नादाला लागल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बोलण्याने ठाकरेंशी जवळीक साधलेला हा शकुनी कोण, अशी नवीन चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते सरळमार्गाने चालणारे आहेत. ते शकुनीच्या चक्रात अडकले आहेत, असे त्यांचीच माणसे मला येऊन सांगायची. ते शरद पवार यांच्यासारखे तरबेज राजकारणी नाहीत.
महाविकास आघाडी आणि धमकी
महाविकास आघाडीने विधानपरिषद १२ आमदारांची १५ दिवसांत नियुक्ती करा, असे धमकी देणारे पत्र मला दिले होते. अशाप्रकारे कोणी पत्र लिहितं का. तुम्ही विनंती करायला हवी. मला निर्णय घेण्यासाठी मुदत कशी दिली जाऊ शकते. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही चुकीची होती. नवीन सरकार आले तेव्हा त्यांनी व्यवस्थित पत्र दिले. म्हणूनच नवीन अध्यक्षांची निवड तत्काळ केली, असा खुलासा कोश्यारी यांनी केला.
शरद पवारांचा खुलासा राजकीय
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी शरद पवार यांना माहित होता. मात्र, शरद पवार हे मान्य करत नाहीत. यावर कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे आता राजकीय उत्तर देत आहेत. त्यावर मला बोलायचे नाही. पण, तो शपथविधी एका रात्रीत झालेला नाही, असे कोश्यारी म्हणाले.
मला विमानातून उतरवले…
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मला विमानातून खाली उतरवले अखेर ठाकरेच खुर्चीवरुन खाली आले, असे वक्तव्यही कोश्यारी यांनी केले आहे.
पहाटेचा शपथविधी…
पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ”देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले. त्यांनी सांगितलं आम्ही बहुमत सिद्ध करू. मीही म्हटलं, ठीक आहे. कारण घटनेत दिलेल्या निर्देशानुसार विधनासभेत बहुमत सिद्ध केलं जातं. बहुमत राज्यपालांसमोर किंवा राष्ट्रपतींसमोर जाऊन सिद्ध केलं जात नाही. यात दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे मीही म्हटलं, तुम्ही शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा. यात माझं कुठं चुकलं? कोणी संविधान तज्ज्ञ असेल तर त्यांनी यात काय चुकलंय ते सांगावं.”
Ex Governor Bhagat Singh Koshyari Interview