लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाजार समित्यांमध्ये सोसायटी संचालकांऐवजी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार योग्य आहे. मात्र या बाजार समित्यांना निवडणूक खर्चामुळे निवडणूका घेणे कठीण होणार असून खर्चामुळे या संस्था मोडकळीस निघतील. या संस्थाकडे पुरेसा निधी नाही. सहकार संस्थांवर यांचे सदस्य नसल्याने गेल्या सरकारमध्ये देखील त्यांनी बाजार समित्यांवर आपले प्रतिनिधी मागच्या दाराने आत पाठविले होते. त्यांना आपले लोकप्रिनिधी वाढवायचे असेल तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे असे सांगत भाजपकडून सरकार चळवळ मोडकळीस काढली जात असल्याची टीका राज्याचे माजी उपुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
लासलगाव येथील स्वामी लॉन्स येथे नवनिर्वाचित विविध सहकारी सोसायटी संचालकांचा जाहीर सत्कार व शेतकरी मेळावा छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गुणवंत होळकर, हरिश्चंद्र भवर, निफाडचे माजी उपनराध्यक्ष अनिल कुंदे,प्रकाश वाघ,शिवाजी सुरासे, शिवाजी सुपनर, शिवाजीराव ढेपले, दत्तूपाटील डुकरे, ललित दरेकर, संजय होळकर, सचिन दरेकर, अशोक गवळी, मंगेश गवळी, बबन शिंदे, अशोक नागरे, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, डॉ. विकास चांदर, ज्ञानेश्वर शेवाळे, विलास गोऱ्हे, विशाल पालवे,विनोद जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सहकार म्हणजे स्वहाकार नव्हे सहकारी संस्था टिकविण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांवर संचालक मंडळाने या संस्था ओरबडून खाल्या आहेत. त्यामुळे काही सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहे. नाशिक जिल्हा बँकेत देखील असाच प्रकार झाल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम सहकारी सोसायट्यांनी केले आहे. सहकारी सोसायट्या या केवळ कर्ज पुरवठा करण्यापूर्त्या मर्यादित राहू नये त्यांनी आपल्या कार्यकक्षा अधिक वृद्धिंगत करण्यात याव्यात. राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहे. त्यांचा आदर्श सर्व सोसायट्यांनी घ्यावा असे आवाहन करत आमचा सहकार आम्ही मोडीत निघू देणार नाही तर वेळप्रसंगी तुमचं सरकार मोडीत काढू असे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात महविकास आघाडी यापुढेही निवडणुकींना एकत्रित सामोरे जाईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटन अधिक मजबूत करावे आणि महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, गेल्या सात ते आठ दिवांपासून सुर्यच दिसत नव्हता तो शिंदे गटात गेला की काय अशी मिश्किल टीपणी केली. ज्या नाशिक मुंबई प्रवासासाठी कमी वेळ लागत होता मात्र आता रस्त्यात अधिक खड्डे झाल्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे प्रवास करून परिस्थीती जाऊन घ्यावी अशी टीका त्यांनी केली. तसेच केंद्र सरकारने अनेक शब्दांना असंसदीय ठरविले आहे. लोकप्रतिनिधींना बोलण्यासाठी अडथळे निर्माण करून आवाज दाबण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
लासलगाव परिसरातील गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १७८ किलोमिटर रस्त्याचे काम मंजूर झालेली आहे. लासलगाव रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून हा रस्ता लवकरच कार्यान्वित होईल. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले असून ही कामे लवकरच त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. तसेच महावितरणसह इतर अनेक महत्वाची पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
नांदूरमधमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने सोळा गाव पाणी पुरवठा खंडित झाला होता. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेट बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर योजनेचे काम सुरू होईल तसेच सदर योजना सौर ऊर्जेवर विकसित करण्यात येत असल्याने विजेच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, हरिश्चंद्र भवर,अनिल पाटील कुंदे शिवाजीराव ढेपले, दत्तू पाटील डुकरे, रणजित गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
EX DYCM Chhagan Bhujbal on APMC lost State Government Decision