मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायबर सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाचे आणि गोपनीय काम असते परंतु सायबर सिक्युरिटीसारख्या महत्त्वाच्या विषयाच्या ऑडिटचे काम कमी अनुभव असलेल्या आयसेक सिक्युरिटी कंपनीला का दिले, याचा खुलासा करण्यासंदर्भात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राष्ट्रीय शेअर बाजाराला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. समजते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून या संदर्भात खुलासा प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात मनी लॉड्रिंगचा आणखी एक नवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या को-लोकेशन घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याच्या संशयावरून ईडीने मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची रोजी दिल्ली येथे तीन तास चौकशी केली होती. या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी एनएसई-को-लोकेशन घोटाळ्यासंदर्भात पांडे यांना काही प्रश्न विचारत त्यांचा जबाब नोंदविला. पांडे यांचा जबाब मनी लॉड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत नोंदवल्याचे समजते.
तर दुसरीकडे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CBI ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्याविरुद्ध शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयची ही कारवाई करण्यात आली आहे.
संजय पांडे आणि रामकृष्ण यांच्याशिवाय सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) माजी सीईओ आणि एमडी रवी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले नारायण आणि रामकृष्ण यांच्याकडूनही आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. याबाबत एका CBI अधिकाऱ्यांनी सांगितले की CBI दिल्ली, मुंबई, पुणे, कोटा, लखनौ, चंदीगड आणि इतर शहरांमध्ये 20 ठिकाणी छापे टाकत आहे आणि माजी आयुक्त पांडे यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई सुरू आहे.
दरम्यानच्या काळात २०१० ते २०१५ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व्हर आणि आयटी सिक्युरिटी ऑडिटचे काम संजय पांडे यांनी २००१ साली स्थापन केलेल्या आय-सेक सिक्युरिटीज प्रा. लि. या कंपनीला मिळाले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यामध्ये २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास केला होता. सीबीआयने तपासाच्या आधारे एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि समूहाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांना यापूर्वीच अटक केली आहे.
सध्या संजय पांडे मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात नुकतेच ईडीसमोर हजर झाले होते. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले.
मार्च 2001 मध्ये संजय पांडे यांनी या कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कंपनीचा कारभार त्यांच्या मुलाने आणि आईने बघितला. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यामुळे सध्या या प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे.
Ex CP Sanjay Pandey Company Contract ED notice to National Stock Exchange