कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथून एका तरुणाने धमकीचे फोन आणि मेल केल्याचे समोर आले आहे. या धमकीच्या फोननंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र काही वेळेनंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता कराड पोलीस पथक नांदेडला जाण्याची शक्यता आहे.
कराड येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमधील राहत्या घरी हा धमकीचा फोन आला. त्यानंतर खळबळ निर्माण झाली. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुध्दा पडले.
या अधिवेशनात चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना हा फोन आला. भिडे यांच्या विरोधात याअगोदरच अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २४ तासात संभाजी भिडेंना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हा काँग्रेसने दिला आहे.