मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून पद भूषवलेले मराठमोळे न्यायमूर्ती उदय लळीत काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आणि त्यांच्या कारकीर्दीत काही वादही निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित असताना सरन्यायाधीश हे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता या कार्यक्रमातील उपस्थितीबाबत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सप्टेंबर महिन्यात सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबईत सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सु्प्रीम कोर्टात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिंदे फडणवीस सरकारची वैधता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार असताना दुसरीकडे सरन्यायाधीशांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
त्यांनी सांगितले की, “तो कार्यक्रम मुंबई हायकोर्टाने आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित काही प्रकरणे सुप्रीम कोर्टात आहेत, ही बाब खरी आहे. पण ती माझ्या कोर्टासमोर, खंडपीठासमोर नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने हा कार्यक्रम आयोजित केल्याने मी तिथे उपस्थित होतो. तर, मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कार्यक्रमाला उपस्थित होते. एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. ती महापूजा वैयक्तिकपणे ते हजर नसतात. तर, राज्यातील जनतेचे प्रतिनिधी म्हणून ती पूजा त्यांच्या हस्ते होते.” एका विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत मनमोकळेपणाने उत्तर दिले. आपल्या कार्यकाळात काही महत्त्वांच्या मुद्यांवर घटनापीठांची स्थापना केली. अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील याकडे लक्ष पुरवले असल्याचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितले. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला हे राज्यातील जनतेच्यावतीने उपस्थित असतात. मुंबई हायकोर्टाचा कार्यक्रम हा राज्यातील लोकांच्यावतीने आयोजित होता, असेही पुढे ते म्हणाले.
एक मराठी माणूस राज्याबाहेर गेला असला तरी त्याला आपल्या मातीबद्दल, राज्याबद्दल एक ओढ, प्रेम असते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख, जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे त्यात काही वावग नाही असेही माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी स्पष्टपणे सांगितले.
मा. सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही. pic.twitter.com/3pkPzx2KqY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 11, 2022
EX CJI Uday Lalit on CM Eknath Shinde Same Dias