नवी दिल्ली – देशाचे माजी सरन्यायाधीश आणि सध्या राज्यसभेत खासदार असलेले रंजन गोगोई यांनी आपल्या जस्टिस फॉर द जजः एन ऑटोबायोग्राफी या आत्मचरित्रात रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वसंमतीने निर्णय सुनावल्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी खंडपीठातील इतर न्यायाधीशांसोबत हॉटेल ताज मानसिंग येथे रात्री भोज केले होते. त्यादरम्यान त्यांनी सर्वात चांगली गुणवत्ता असलेली वाईनही ऑर्डर केली होती.
रामजन्मभूमी खटला त्यांच्या करिअरमधील प्रमुख घटनांपैकी एक आहे. ते लिहितात, निर्णय सुनावल्यानंतर सरचिटणीसांनी अशोक चक्राच्या खाली न्यायालय क्रमांक १ च्या बाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत एका फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मी न्यायाधीशांना डिनरसाठी ताज मानसिंह हॉटेलमध्ये नेले होते. आम्ही चायनीज जेवण घेतले आणि तेथे उपलब्ध असलेली सर्वात चांगली वाईनही घेतली.
दरम्यान, अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणात सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने निर्णय सुनावला होता. त्यामध्ये रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती ए. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नझीर यांचा समावेश होता.
न्यायमूर्ती गोगोई, न्यायमूर्ती चेलमेश्वर, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी २०१८ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल गोगोई लिहितात, की जे केले ते योग्य केले. त्यांना पत्रकार परिषदेची अपेक्षा नव्हती. काही पत्रकारांसोबत फक्त बैठक होईल अशी अपेक्षा केली होती. त्याशिवाय त्यांच्यावर लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सुनावणी करणार्या खंडपीठात स्वतः सहभागी झाल्याबद्दल गोगोई यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मान्य केले की, ती त्यांची चूक होती आणि सर्वांकडूनच चुका होत असतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्यसभा सदस्याचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ते म्हणाले, की ते कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून त्यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती झाली आहे.