इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगड येथील महापौराच्या निवडणुकीत वर्षभरापूर्वी मतदानातील गैरप्रकार घडल्याचा प्रकारावर न्यायालायाने मोठा दणका दिला होता. आता हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वोच्च न्यायालयाने सरपंच करुन पुन्हा निवडणुकीतील गैरप्रकाराला चाप दिला आहे. या निकालाची गेल्या दोन दिवसांपासून देशभर चर्चा असून पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवरुन विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे.
सरपंचपदाच्या या निवडणुकीत वाद हा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. बुआना लाखू गावांत सरपंचपदासाठी २ नोव्हेंबर २०२२ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात कुलदीप सिंह यांना विजयी घोषित केले होते. त्यानंतर या निवडणुकीत पराभूत झालेल्या मोहित कुमार या उमेदवाराने निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली. त्यात पानीपतच्या अतिरिक्त सिव्हिल न्यायाधीशांनी एका निर्णयात बूथ क्रमांक ६९ वरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु हा आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केला. त्यानंतर मोहित कुमार यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. ३१ जुलैला हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणीस आले तेव्हा कोर्टाने ईव्हीएम आणि अन्य रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका बूथची मतमोजणी करण्याऐवजी सर्वच मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि इतर नोंदी मागवल्या आणि त्यांच्या रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली मतमोजणी केली. आणि या मतमोजणीनंतर पंजाब हरियाणा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि मोहित कुमार यांना सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र घोषित केले.
या प्रकारावर काँग्रेसने टीका केली आहे. ईव्हीएमने ‘मतचोरीचा’ खेळ पहा असे सांगत काँग्रेसने पोस्ट केली आहे. पानिपतमधील एका गावात सरपंच निवडणुका झाल्या – ईव्हीएमने मते टाकण्यात आली. निवडणूक निकालांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मागवले आणि त्यांच्या देखरेखीखाली फेरमतमोजणी केली आणि त्यातून निघालेल्या निकालाने सर्वांना आश्चर्यचकित केले. फेरमतमोजणीनंतर निकाल उलट करण्यात आला आणि आधी पराभूत झालेल्या उमेदवाराला सरपंच करण्यात आले. अशा प्रकारे देशात वेगवेगळ्या प्रकारे तुमची मते चोरीला जात आहेत.