अभोणा व मानूर सेंटरची बेड संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा तैनात करा
कळवण – कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेवटच्या माणसापर्यंत कोरोना लस मिळेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून मी देखील कळवण उपजिल्हा रुग्णालयात लस घेतली. कळवण व सुरगाणा तालुक्यातील जनतेने कोरोनापासून सुरक्षा मिळविण्यासाठी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे असे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केले.
आमदार पवार यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अरुण थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शरदसिंग परदेशीं होते. कळवण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून अभोणा व मानूर येथील कोरोना सेंटरच्या बेडची संख्या वाढवून तेथे सक्षम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करावी व तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा हस्तांतरित करुन कोरोना बाधित रुग्णांचे तेथे विलगीकरण करावे अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अरुण थोरात यांच्याकडे यावेळी केली. यावेळी कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा व लसीकरणचा आमदार पवार यांनी आढावा घेतला.
कळवण तालुक्यात कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू असून नागरिकांनी लसीकरणासाठी तत्परतेने पुढे येत आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रात जाऊन नागरिक लस घेत आहे. आज आमदार नितीन पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण केंद्राची पाहणी करुन आरोग्य यंत्रणेशी व नागरिकांशी संवाद साधला.
कळवण उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितीन पवार यांनी कोरोना लस घेऊन लस सुरक्षित आहे, ती सर्वांनी घ्यावी असा संदेश जणू या निमित्ताने दिला.यावेळी त्यांनी लसीकरणास आलेल्या नागरिकांशी सवांद साधून लसीबाबतच्या सर्व शंकांकुशंकाचे निरसन केले. लसीकरण संदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेत नागरिकांना आरोग्य यंत्रणेने सहकार्य करण्याचे आवाहन करुन उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राची आमदार नितीन पवार यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रायुका तालुकाध्यक्ष संदीप वाघ, ओतूरचे सरपंच मंगेश देसाई, दिगंबर पवार, देवा मोरे,शशिकांत बागुल, संदीप पगार,दीपक महाजन सागर खैरनार आदी उपस्थित होते.