नवी दिल्ली – अवैध कारभार आणि संशयास्पद हालचालींमुळे जगभरातील विविध देशांमधून दररोज ३०० पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी होते आणि त्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखविला जातो. सदैव जगाच्या नुकसानाचा विचार करणाऱ्या या लोकामुळे सामान्य पाकिस्तानी नागरिकांना मात्र अकारण त्रास सहन करावा लागतो, हेही वास्तव आहे.
गेल्या सहा वर्षांमध्ये १३८ देशांमधून एकूण ६ लाख १८ हजार ८७७ पाकिस्तानी नागरिकांची त्यांच्या मायदेशी हकालपट्टी करण्यात आली आहे. सरासरी ३०० नागरिक दररोज पकडले जातात आणि त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येतो.
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, परत आलेल्या या नागरिकांना त्या त्या देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानी दुतावासातून किंवा उच्चायोग कार्यालयांतून योग्य सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अशात बहुतांश नागरिकांना व्हिसाची मर्यादा संपत असल्याने किंवा त्यांचे वर्क परमिट संपत असल्याने परत यावे लागले. अर्थात अवैधरित्या पाकिस्तानातून बाहेर पडल्यानंतर संबंधित देशांमध्ये पकडण्यात आलेल्या नागरिकांची संख्याही जास्त आहे, याची कबुली एजन्सीने दिली आहे.
५२ टक्के सौदीमधून
साऊदी अरब हा पाकिस्तानचा खास मित्र मानला जातो. मात्र गेल्या सहा वर्षांत सर्वाधिक म्हणजे ५२ टक्के पाकिस्तानी नागरिकांना घरचा रस्ता दाखविण्यात साऊदी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे एकूणच ७२ टक्के पाकिस्तानी नागरिकांची त्या देशांमधून हकालपट्टी झाली आहे जे पाकिस्तानचे घनिष्ट मित्र मानले जातात. सौदीसह ओमान, युएई, कतार, बहारीन, इराण आणि तुर्की या देशांचा यात समावेश आहे. यातील सर्वांत जास्त म्हणजे ३ लाख २१ हजार ५९० पाकिस्तानी नागरिक सौदीतून परतले आहेत.