नवी दिल्ली – संपूर्ण जगातील आखिल मानवी जिवाला हादरवून टाकणाऱ्या कोरोनाने गेल्या दीड ते दोन वर्षात जणू काही थैमान घातले आहे. आरोग्य शास्त्रज्ञांच्या व वैद्यकीय संशोधकांच्या मदतीने अनेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असून त्याला आता काहीसे यश येत असे असताना युरोपसह जगातील काही देशांमध्ये अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. किंबहुना हा धोका वाढलेला दिसून येत आहे. सध्या युरोप हे कोरोना महामारीचे केंद्र बनले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपीय देश अनेक कठोर उपाययोजना करत असून अनेक देश मास्क आणि बूस्टर डोसच्या मदतीने कोरोनाची पाचवी लाट रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता ब्रिटन, डेन्मार्कसह अनेक देशांनी पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य केले आहे. लॉकडाऊनमधून बाहेर पडत असलेल्या नेदरलँड आणि ऑस्ट्रियासह बेल्जियम आणि क्रोएशियाने वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा मास्क घालणे आवश्यक केले आहे.
मास्क घाला जीव वाचवा
काही शास्त्रज्ञ नागरिकांना हिवाळ्यात मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत. मास्कचा वापर वाढवल्यास युरोपमध्ये हजारो जीव वाचू शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. स्वानसी युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ सायमन विल्यम्स म्हणाले की, इंग्लडमध्ये अजूनही घरामध्ये मास्क घालण्याची गरज आहे. मात्र जर लोकांनी मास्क घालण्याची सवय सोडली असेल तर त्यांनी ही सवय पुन्हा लावली पाहिजे. कारण हिवाळ्यात दुकाने, ट्रेन आणि पब आणि रेस्टॉरंट्स सुरक्षित ठेवायचे असतील तर मास्क घालावे लागतील.
बूस्टर डोसचा वेग वाढला
युरोप, अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण रोखण्यासाठी बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. अमेरिकन सरकारने सर्व प्रौढांसाठी बूस्टर डोस मंजूर केला. त्यामुळे ज्यांनी सहा महिने दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना बूस्टर डोस मिळू शकतो. तसेच ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इटली सर्व प्रौढांना बूस्टर डोस देत आहेत. तसेच स्वीडन आणि स्पेनसह काही देशांनी ज्येष्ठ नागरिकांना आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेल्यांसाठी बूस्टर मंजूर केले आहेत. बूस्टर डोस देणार्या देशांमध्ये इस्रायल, ब्रिटन, दक्षिण कोरिया, तुर्की आणि ब्राझील यांचा देखील समावेश आहे.
या देशात सर्वाधिक डोस
जगभरात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत दिलेल्या एकूण लसींपैकी बूस्टर डोसचा वाटा सुमारे १२ टक्के आहे. आत्तापर्यंत, इस्रायल, चिली आणि उरुग्वेने १०० टक्के नागरिकांना सर्वाधिक बूस्टर डोस दिले आहेत.
भारतात बूस्टर डोसची गरज आहे की नाही
लशीच्या बूस्टर डोसच्या संदर्भात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, सध्या देशात रुग्णांची संख्या वाढलेली दिसत नाही. लशीचे दोन डोस अजूनही कोरोना विषाणूपासून संरक्षण देत आहेत. त्यामुळे सध्या बूस्टर किंवा लशीच्या तिसऱ्या डोसची गरज नाही, असे ते म्हणाले.
युरोपात देशात कठोर निर्बंध (कोणत्या देशात आहे अशी स्थिती)
ऑस्ट्रिया: ऑस्ट्रियामध्ये सोमवारपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दि १ नोव्हेंबरपासून सर्वांसाठी लशीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
स्लोव्हाकिया: लशीकरण न केल्यास सर्व दुकाने आणि विना-आवश्यक वस्तूंच्या शॉपिंग मॉल्सवर बंदी घालण्यात येईल. अशा नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमांना जाता येणार नाही. तसेच रोज कामावर जाण्यासाठी त्यांना दोनदा तपासणी करावी लागेल.
ग्रीस: लशीकरण केल्याशिवाय, तसेच चाचणीत संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय कोणीही बार, रेस्टॉरंट, सिनेमा आणि जिममध्ये जाऊ शकणार नाही.
झेक प्रजासत्ताक: लशीकरण न केलेल्या नागरिकांनाना रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल आणि इतर सेवांमध्ये जाण्यास मनाई आहे. तसेच सरकार नव्याने आणीबाणी लागू करण्याच्या तयारीत आहे.
बेल्जियम: मास्क घालण्याच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्समध्ये जाण्यासाठी कोविड पास आवश्यक आहे. लशीकरण अनिवार्य करण्याची तयारीही सुरू आहे.
नेदरलँड्स: नेदरलँड्सने गेल्या आठवड्याच्या शेवटी तीन आठवड्यांचा आंशिक लॉकडाउन लादला. रेस्टॉरंट आणि बार रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. क्रीडा स्पर्धांदरम्यान प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे.
डेन्मार्क: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोविड पास पुन्हा आणण्याची योजना आहे.
क्रोएशिया: सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी लशीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
इटली: कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी कोविड ग्रीन पास आवश्यक असेल.