नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत ईएसआयसी मुख्यालय येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ईएसआयसी) १९४ वी बैठक झाली. केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे देखील या बैठकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ईएसआयसीविषयक पायाभूत सुविधा तसेच ईएसआयसीकरून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीत ईएसआय महामंडळासाठीच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
१० नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना
देशभरात अंधेरी (महाराष्ट्र),बसाईदरापूर(दिल्ली), गुवाहाटी-बेल्तोला (आसाम), इंदोर (मध्य प्रदेश),जयपूर (राजस्थान), लुधियाना (पंजाब), नरोडा-बापूनगर(गुजरात), नोईडा आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) तसेच रांची (झारखंड) अशा १० ठिकाणी नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यास ईएसआय महामंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.
येत्या ५ वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमात ७५ हजार नव्या जागांची निर्मिती करण्यासंदर्भात पंतप्रधानांनी यावर्षीच्या (२०२४) स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा निर्णय आहे.