नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खाण आणि पायाभूत सुविधा उद्योगांसाठी उत्पादकता व शाश्वतता भागीदार असलेली अग्रगण्य कंपनी एपीरॉक एबीने आज नाशिक येथे आपल्या नवीन उत्पादन व संशोधन केंद्राचे भूमिपूजन केले. हे नवे केंद्र भारतासह जागतिक ग्राहकांना उच्च दर्जाचे उत्पादने आणि उपाय उपलब्ध करून देण्याच्या एपीरॉकच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे, जे सुरक्षा आणि उत्पादकता अधिक बळकट करतील.
या नव्या ठिकाणी खाणकाम व बांधकाम ग्राहकांसाठी भूमिगत व जमिनीवरील उपकरणांची निर्मिती, संशोधन व विकास (आर अँड डी) तसेच नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी केली जाईल. या केंद्रामध्ये उत्पादन व प्रोटोटायपिंगसाठी इमारती, संशोधन प्रयोगशाळा, कार्यालये आणि बाहेरील उपकरण चाचणी मार्ग यांचा समावेश असेल. या केंद्राचे कामकाज २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होण्याची अपेक्षा असून पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या संकुलाचा एकूण विस्तार सुमारे १,७५,००० चौ.मी. असेल.
एपीरॉकच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हेलेना हेडब्लॉम म्हणाल्या,“भारतातील वाढणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठेत आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी नाशिकमधील हे नवे केंद्र हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे आमच्या जागतिक ग्राहकांना देखील बळकटी देईल.”
एपीरॉकची भारतातील नाशिकसह विविध ठिकाणी उत्पादन व नवोन्मेष केंद्रे आहेत आणि देशात एकूण सुमारे १,७५० कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढणारी संशोधन व विकास टीम आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात, एपीरॉकने हैद्राबाद येथे खडक खोदणी साधनांच्या उत्पादनासाठी विस्तारित उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले, तसेच गेल्या वर्षी त्याच शहरात नवीन नवोन्मेष व तंत्रज्ञान केंद्र सुरू केले.
नाशिकमधील या नव्या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि एपीरॉकच्या नाशिकमधील सध्याच्या सुमारे २८० कर्मचाऱ्यांच्या कार्यबलात आणखी २०० नवीन थेट पदांची भर पडेल.
एपीरॉक इंडिया चे अध्यक्ष अरुणकुमार गोविंदराजन म्हणाले,“भारतातील या पुढील विस्ताराबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत. येथे प्रचंड वाढीची क्षमता आहे. या गुंतवणुकीद्वारे आम्ही आमच्या स्थानिक तसेच जागतिक ग्राहकांसाठी उत्पादकता आणि शाश्वततेचे भागीदार म्हणून कार्यरत राहण्यास उत्सुक आहोत. हे नवे केंद्र ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही बळकटी देईल.”
