इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येथील ईपीएफओच्या कार्यालयात सीबीआयच्या पथकाने सोमवारी (२५ एप्रिल) रोजी सायंकाळी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याला ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेऊन पलायन करताना संशयित अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. लाच दिलेले तीन लाख रुपये सीबीआयने जप्त केले असून, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे.
सर्वोदय नगर येथील ईपीएफओ विभागीय कार्यालयात चौबेपूरमधील शाळेचे संचालक जयपाल सिंह यांच्या शाळेविरुद्ध सुरू असलेला पीएफ वाद आणि दंड मागे घेण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी अमित श्रीवास्तव यांना चार लाखांची लाच देण्याचे ठरले. यासाठी एका सल्लागार एजन्सीच्या दलालाने मध्यस्थी केली होती. याचदरम्यान शाळा संचालक सिंह यांनी सीबीआयला नियोजनानुसार विभागीय कार्यालयाच्या खाली गॅलरीमध्ये अधिकारी श्रीवास्तव यांच्या हातात ५००-५०० रुपयांच्या निशाण लावलेल्या ६ गड्ड्या दिल्या.
अधिकारी श्रीवास्तवर यांची कार्यालयीन सुट्टी झाली होती आणि कार्यालय बंद करून ते घराकडे निघाले होते. पैसे हातात पडताच श्रीवास्तवर कार्यालयाच्या गेटबाहेर जात असतानाच सीबीआयच्या पाच-सहा अधिकाऱ्यांनी त्यांना पळत जाऊन पकडले. श्रीवास्तव यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीबीआयचे पथक त्यांना पकडून पुन्हा कार्यालयात घेऊन आले. या वेळी मध्यस्थी करणाऱ्या दलालाही अटक करण्यात आली. शाळा संचालकांनी सर्व आरोप सक्तवसुली संचालनायाच्या अधिकाऱ्यावर केले. आपणच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि अधिकाऱ्याला पकडले अशी माहिती संचालकाने माध्यमांना दिली.
सीबीआयच्या पथकाने अधिकाऱ्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी तीन फाइल्स जप्त केल्या आहेत. पीएफ आयुक्त अमूलराज सिंह यांना याविषयी माहिती दिल्यानंतर तेसुद्धा चौकशीदरम्यान हजर राहिले. त्यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सक्तवसुली अधिकाऱ्याने शाळा व्यवस्थापनाला ३० लाखांची नोटीस पाठवून जास्त कर्मचारी आणि कमी अंशदान देत असल्याचा आरोप केला. तर शाळा संचालकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.