मुंबई – सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणार्या बहुतांश कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे अर्थात पीएफ खाते असते. पण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना सात लाखांपर्यंत मोफत विम्याची सुविधा देत आहे. कर्माचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत पीएफ खाते उघडले असेल तर तुम्ही या मोफत सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
ही एक विशेष योजना आहे. यामध्ये ईपीएफ सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीमअंतर्गत विमा कव्हर केला जातो. त्याअंतर्गत योजनेत ज्या नॉमिनीला सहभागी करून घेतले आहे, त्यांना ७ लाख रुपयांपर्यंत विम्याचा लाभ मिळू शकतो. तुम्ही खासगी कंपनीत काम करत असले तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर चला मग जाणून घेऊया या विमा योजनेबाबत.
एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम अंतर्गत कोणत्याही कर्मचार्याचा आजारपणामुळे, दुर्घटनेमुळे किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीकडून निश्चित करण्यात आलेल्या नॉमिनीला विम्याचा लाभ मिळू शकतो. कर्मचार्याने जर नॉमिनीचे नाव दिले नसेल, तर विम्याचा पूर्ण लाभ कर्मचार्याची पत्नी किंवा त्याच्या मुला-मुलीला मिळतो. क्लेम करणार्या व्यक्तीचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे लागले. १८ वर्षांपैक्षा कमी वय असल्यास त्याचे पालक क्लेम करू शकतात.
ईपीएफच्या सदस्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. ईपीएफचे सदस्य आपोआपच या योजनेत सहभागी होऊन जातील. या विशेष योजनेचे अनेक फायदे आहेत. त्याचा लाभ थेट ईपीएफ सदस्यांना मिळतो.