मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनामुळे नागरिकांना बचतीचे महत्त्व समजले आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद करून ठेवण्यासाठी भविष्य निर्वाह निधीसारख्या बचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एक मोठा निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. परंतु केंद्र सरकारने आता बचत योजनांमधील रकमेवरही कर लावण्यास सुरुवात केली आहे.
निवृत्तीनंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) द्वारे निर्वाह करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिल २०२२ पासून बदललेल्या नियमांनुसार तुमच्या पीएफ खात्यात २.५ लाख रुपयांहून अधिक योगदान जमा झाले असेल तर मिळणाऱ्या व्याजावर किती टक्के टीडीएस कापला जाईल याबद्दल ईपीएफओने स्पष्ट केले आहे. तुमच्या पीएफ खात्यात अडीच लाखांहून अधिक रक्कम असेल, तर ही बातमी तुम्ही पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
ईपीएफओने नवे नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू केले आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून ८.१ टक्क्यांचे व्याज मिळत आहे. ईपीएफओने हा नियम गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये सूचित केला होता.
तुमच्या पीएफ खात्याक २.५ लाख रुपयांहून अधिक योगदान जमा झाले असेल, तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर १० टक्के टीडीएस कापला जाणार आहे. तसेच तुमच्या ईपीएफओ खात्याशी पॅन कार्ड लिंक नसेल तर व्याजातून २० टक्के टीडीएस कापला जाईल. समजा तुम्ही एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय असाल, तर तुमच्या ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या व्याजावर ३० टक्के टीडीएस कापला जाणार आहे.
राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर म्हणाले, की २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खात्यातील रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे.
राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना श्रम रोजगार मंत्री रामेश्वर म्हणाले, की २०२१-२२ या आर्थिक वर्षात पीएफ खात्यातून ९१,१८७.५४ रुपये काढण्यात आले होते. तर २०१९-२० या आर्थिक वर्षात पीएफ खात्यातून ५०,५६८.४८ कोटी रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम महामारीपूर्वीच्या तुलनेत २९.८ टक्के अधिक आहे.