नवी दिल्ली – युआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आज सांगितले आहे की प्राधिकरणाच्या सर्व सेवा स्थैर्यासह उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. तसेच आधारक्रमांकाशी पॅन किंवा ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे खाते जोडण्याशी संबंधित, प्रमाणीकरणावर आधारित सुविधेमध्ये कोणतेही अडथळे नाहीत.
प्राधिकरणाने म्हटले आहे की गेल्या आठवड्यापासून त्यांच्या प्रणालींमध्ये काही सुरक्षाविषयक अत्यावश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया कालबद्ध रीतीने सुरु असल्यामुळे, काही नावनोंदणी/ अद्ययावतीकरण केंद्रांमध्ये केवळ नावनोंदणी आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे या सेवांच्या परिचालनात थोडे अडथळे निर्माण झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या, आता सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते अडथळे देखील दूर झाले आहेत.
प्राधिकरणाने सांगितले की जरी प्रणालीचे स्थिरीकरण झालेले असले तरीही नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रणालीचे निरीक्षण कार्य प्राधिकरणाने सुरु आहे. २० ऑगस्ट २०२१ ला अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रतिदिन सरासरी ५.६८ लाख नोंदण्या या दराने गेल्या ९ दिवसांत ५१ लाखांहून अधिक रहिवाशांनी नावनोंदणी केली आहे तसेच प्रतिदिन ५.३ कोटीहून अधिक प्रमाणीकरणाच्या वेगाने प्रमाणीकरण व्यवहार देखील नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु आहेत. आधारशी पॅन/ ईपीएफओ जोडण्याची प्राधिकरणाची सुविधा बंद असल्याच्या काही माध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्ताला प्रतिसाद देताना प्राधिकरणाने हे स्पष्टीकरण देऊन सांगितले आहे की प्रसिध्द झालेली ही वृत्ते योग्य नाहीत.