नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटांशी सामना करावा लागला आहे. देशातील अनेक लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावले आहे. या महामारीत अनेक आई-वडिलांनी आपल्या नोकरी करणा-या मुला-मुलींना गमावले आहे. आता अशा पालकांना ईपीएफओकडून आजीवन निवृत्तिवेतन मिळणार आहे. या निवृत्तिवेतनासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. कोणत्या व्यक्तीला कधी निवृत्तिवेतन मिळेल हे आपण जाणून घेऊयात. ईपीएफोच्या निवृत्तिवेतनाची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. सध्याच्या एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंडच्या नियमांनुसार, घरात एकट्या कमविणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि संबंधित व्यक्तीच्या आई-वडिलांचे वय अधिक असेल. अशा ज्येष्ठ आई-वडिलांची देखभाल करणारा कुटुंबात कोणीही नसेल, तर त्यांना EPS-95 नियमांतर्गत आजीवन निवृत्तिवेतन मिळेल.
या आर्थिक मदतीमध्ये कर्मचार्याने कमीत कमी दहा वर्षांची नोकरी पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्मचारी नोकरीदरम्यान एखाद्या आजारामुळे शारिरीक सक्षम नसेल तसेच त्याने निर्धारित सेवा पूर्ण केली नसली तरी त्याला आजीवन निवृत्तिवेतन मिळू शकते. ईपीएफओमध्ये पात्र कर्मचार्यांना आपला बेसिक पगार आणि महागाई भत्त्यासह १२ टक्के योगदान द्यावे लागते. संबंधित कंपनी किंवा संस्थेलासुद्धा तितकेच योगदान देणे आवश्यक आहे. निवृत्तीच्या वेळी संबंधितांना व्याजासह पूर्ण पैसे परत मिळतात. लॅडर ७ संस्थेचे संस्थापक सुरेश सांगतात, कर्मचा-यांकडून ईपीएफ खात्यात १२ टक्के जातात. तसेच कंपनीच्या १२ टक्क्यांपैकी ३.६७ टक्के ईपीएफ खात्यात आणि उर्वरित ८.३३ टक्के ईपीएस (एम्प्लॉय पेन्शन स्किम) मध्ये जातात. ईपीएफमध्ये १२ टक्क्यांहून अधिक योगदान दिल्यास व्हीपीएफमध्ये रुपांतरित होते. अशा परिस्थितीत कंपनीच्या योगदानाशी जोडून पाहिले जात नाही. काही विशेष परिस्थितींमध्ये १२ टक्क्यांहून कमी योगदान देण्यास मान्यता असते. जर कंपनीतील कर्मचा-यांची संख्या वीसपेक्षा कमी असेल तर कर्मचारी आणि कंपनी १०-१० टक्क्यांपर्यंत योगदान देऊ शकतात. ईपीएफमध्ये जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी हा पर्याय ठेवण्यात आला आहे.