इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय असतात. त्यातही वेगळे विषय हाताळणाऱ्या मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. म्हणूनच ‘झी मराठी’ ही बराच काळ प्रेक्षकांची आवडती वाहिनी राहिली आहे. आता मात्र, या वाहिनीचे तंत्र काहीतरी बिघडलेले दिसते आहे. सातत्याने या वाहिनीवरील मालिका बंद होताना दिसत आहेत. भलेही त्याच्या जागी नवीन मालिका सुरू होत आहेत, पण, आधीच्या मालिका वेळेआधीच आटोपत्या घेतल्या जात आहेत. याआधीच दोन मालिका बंद होणार असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती. आता तिसरी मालिका बंद होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण झालं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मालिका सुरू राहील. त्यानंतर या मालिकेच्या जागी ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ हा कार्यक्रम सुरू होईल.
कोणती मालिका होणार बंद?
कमी टीआरपीमुळे ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिका बंद होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. ही गोष्ट ताजी असतानाच आता ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ लवकरच बंद होणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका बंद होण्याचे कारण देखील टीआरपीच आहे. मात्र, याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की, ‘लागिरं झालं जी’फेम शितलीची ही तिसरी मालिका. मात्र, या तिसऱ्या मालिकेला फार प्रतिसाद मिळालेला नाही.
अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका तिच्या पहिल्या मालिकेपेक्षा जास्त काळ चालेली नाही. शिवानीच्या ‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. २०१७ मध्ये सुरू झालेली ही मालिका २०१९ पर्यंत चालली होती. त्यानंतर शिवानीच्या ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ आणि ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. पण या मालिका जास्त काळ टिकाव धरू शकल्या नाहीत. या दोन्ही मालिका सहा महिन्यात बंद पडल्या. आता शिवानीची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका आहे, जी फार काळ चाललेली नाही. १३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेली ‘लवंगी मिरची’ ही मालिका प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरली नाही. तसेच या मालिकेचा टीआरपीही कमी होता. त्यामुळे ‘लवंगी मिरची’ मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.