इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार हे रोज मालिकांच्या रूपाने घराघरात पोहचत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना देखील ते जवळचे वाटतात. त्यामुळेच त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता तर अनेक चित्रपटातील अभिनेते देखील छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये काम करत आहेत. रोज या मालिकांची चर्चा घरघरात होत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, हे कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात.
छोट्या पडद्यावर सध्या ‘माझी तुझी रेशमगाठ’ मालिका बरीच गाजत आहे. या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस तळपदेने बऱ्याच वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. श्रेयस हा छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा अभिनेता आहे. एका भागासाठी तो तब्बल ४८ हजार रुपये घेतो. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून चॉकलेट बॉय स्वप्निल जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तो साकारत असलेली सौरभची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या भूमिकेसाठी स्वप्निल एका भागासाठी ४५ हजार रुपये मानधन घेतो.
‘होणार सून मी या घरची’, या मालिकेतून शशांक केतकर हे नाव घराघरात पोहोचले. शशांक सध्या ‘मुरांबा’ मालिकेत अक्षयच्या भूमिकेत दिसतोय. यासाठी तो एका भागासाठी ४० हजार रुपये घेतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. यात मंदार जाधव साकारत असलेल्या जयदीपची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जयदीपला एका भागासाठी ३८ हजार रुपयांचं मानधन मिळतं. तर ‘स्टार प्रवाह’ वहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील शशांकची भूमिका चेतन वडनेरे साकारत आहे. चेतन वडनेरे हा मराठीतील नवेदित कलाकारांपैकी एक आहे. चेतन मालिकेच्या एका भागासाठी तब्बल ३५ हजार रुपये मानधन घेतो.
Entertainment Marathi TV Serial Celebrity Fees