मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ उपाख्य अशोक मामा होय. अशोक सराफ यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस साजरा झाला आहे. कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा, या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो. उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंगअशोक मामांनी साधत आजवरच्या कारकिर्दीत अशोक मामांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा दबदबा आहे.
आजही अशोक सराफ यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. यात अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, घनचक्कर, वाजवा रे वाजवा यांसारखे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. अलिकडेच एका कार्यक्रमात अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी अशोक मामांच्या करिअरविषय़ी भाष्य केले. अशोक सराफ यांची कलाविश्वात नेमकी एन्ट्री कशी झाली हे त्यांनी सांगितलं. अशोक सराफ यांना त्यांच्या मामामुळे कलाविश्वात नशीब आजमावण्याची संधी मिळाली.
मुळात अशोक सराफ यांच्यामध्ये अभिनयाचे गुण असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मामाच्या कलामंदिर या संस्थेत अभिनयाचं योग्य प्रशिक्षण घेतलं आणि तेथूनच त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरु झाली. आपल्या विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून जर कोणी राज्य केले असेल तर ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक सराफ होय.
अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खटयाळ प्रियकर असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई मध्ये झाला.त्या काळचे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव “अशोक” असे ठेवले गेले. तसे त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे.दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले. मुंबईतील शेठ डी. जी. टी . हायस्कूल मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. अगदी बाल वयापासूनच अशोक सराफ याना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये अभिनय केला होता.
वयाच्या अठराव्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी वि. स . खांडेकर यांच्या “ययाती” या नाटकामध्ये विदूषकाचे भूमिका साकारली. अशा प्रकारे व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात बऱ्याच संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमीला सुद्धा अजरामर ठरल्या. त्यानंतर १९७१ साली प्रदर्शित झालेल्या “दोन्ही घरचा” पाहून या चित्रपटात त्यांना छोटीशी पण दमदार भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही.
फक्त मराठी नाटक आणि चित्रपटांपुरतेच मर्यादित न राहता त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीत सुरुवातीला त्यांची भेट झाली ती विनोदी अभिनेते “दादा कोंडके” यांच्या बरोबर आणि या दोघांच्या अभिनयातून उभा राहिला एक अजरामर चित्रपट ज्याचं नाव होतं “पांडू हवालदार”. अशोक सराफ यांची विनोदी अभिनेते म्हणून खरी कारकीर्द सुरु झाली ती या चित्रपटापासूनच झाली. मात्र विनोदी अभिनेता एवढीच आपली ओळख न ठेवता त्यांनी बऱ्याच चित्रपटांमधून गंभीर आणि खलनायकी भूमिका सुद्धा साकारल्या आहेत ज्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली त्यामुळे सर्व प्रकारच्या भूमिका करणारा अभिनेता अशी त्यांची आणखी एक ओळख निर्माण झाली.
अशोक सराफ यांच्या बरोबर “धूम धडाका”, “आमच्या सारखे आम्हीच”, “फेका फेकी” आणि इतरही बऱ्याच चित्रपटामधे काम करणाऱ्या सुंदर अभिनेत्री “निवेदिता जोशी” यांच्या बरोबर त्यांचे धागे जुळले. अशोक सराफ सारख्या दिग्गज अभिनेत्याने घातलेली लग्नाची मागणी निवेदिता जोशी यांनी अगदी आनंदात स्वीकारली आणि त्या निवेदिता सराफ झाल्या. सन १९९० साली त्यांनी गोव्यामधील एका मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले. त्यानंतरच्या आयुष्यात निवेदिता यांनी अशोक मामांना सर्व सुख दुःखात अगदी उत्तम साथ दिली.
Entertainment Marathi Actor Ashok Saraf Film Entry life Journey