विशेष प्रतिनिधी, नागपूर
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. ही रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठराविक औषधे घेऊन ही प्रतिकारशक्ती वाढेल की अन्य काही, असेही अनेकांकडून विचारले जाते. तर, खासकरुन सोशल मिडियावर अनेक संदेश पसरविले जातात. त्यातील खरे नेमके कोणते आणि खोटे कोणते हे माहित नसल्याने विश्वास नक्की कशावर ठेवावा, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, केंद्र सरकारने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याबाबत त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे सांगितले आहे.
ही त्रिसूत्री अशी
१. दिवसभर गरम पाणी प्यावे. हे पाणी पिल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती नक्कीच वाढते. गरम पाण्यामुळे शरीरातील अन्नाचे पचन, रक्ताभिसरण यासह विविध क्रिया योग्य पद्धतीने घडून येतात.
२. दररोज ३० मिनिटे स्वतःला द्या. या वेळेत योगासने, प्राणायम आणि मेडिटेशन हे करावे. यामुळे मन प्रफुल्लित होते. त्याशिवाय शरीराच्या विविध अवयवांच्या हालचाली होतात. म्हणजेच, शरीर ताजेतवाने होण्यासाठी मदत होते.
३. आपण जो आहार घेतो. त्यात चार वस्तूंचा समावेश आवर्जून करावा. त्या म्हणजे जीरे, लसूण, हळद आणि धने किंवा धने पावडर. स्वयंपाक करताना विविध पदार्थ बनवितांना या चारही मसाल्याचे घटक आवर्जून वापरावेत. या चारही वस्तूंमुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.