नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीने नवनवीन कल्पना जन्म घेतात. या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाल्यास देश आत्मनिर्भरतेकडे निश्चितच वेगाने वाटचाल करेल. असेच काहीसे चित्र दिसत आहे ते नाशिकमधील के. के. वाघ इंजिनिअरिंग मध्ये अभियांत्रिकी वर्षाच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आर्या मिश्रा हिने निर्माण केलेल्या एका उत्पादनामुळे.
आर्या मिश्राने तयार केला आहे तो बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर. शेतीमध्ये अनेक कामांसाठी ट्रॅक्टर चे खूप महत्व आहे. सामान्यतः ट्रॅक्टर हे डिझेलवर चालतात. पण डिझेलच्या किमती तसेच त्यातून होणारे प्रदूषण यावर पर्याय म्हणजे बॅटरीवर चालणारा हा ट्रॅक्टर आर्या ने तयार केला आहे. हा ट्रॅक्टर 7.5 H.P चा असून त्यामध्ये 48 V ची बॅटरी लावली आहे. हा ट्रॅक्टर ए.सी. मोटारवर चालत असून शेतीमध्ये अनेक कामासाठी जसे पिकांवर औषध फवारणी, पेरणी, नांगरणी यासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतो. नुकतीच या ट्रॅक्टर ची यशस्वी चाचणी घेण्यात आली
आर्या मिश्रा या इंजी. स्व. चंद्रभान मिश्रा यांची सुपुत्री आहे. स्व. चंद्रभान मिश्रा यांनी १९८४ मध्ये बॉटलपेकं हे तंत्रज्ञान जर्मनी तून भारतात आणून नाशिकच्या सातपूर मध्ये कारखाना सुरु केला होता. या प्रकल्पासाठी के.के. वाघ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. समीर वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, उपप्राचार्य डॉ शिरीष साने , डॉ.रविंद्र मुंजे, शंतनू शुक्ला, डॉ.शरद धमाळ, इंजि.मनीष मिश्रा व इंजि .प्रेमलता मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनिष रच्चा आणि कांचन शिंदे यांनी सहकार्य केले.