इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे सुरू असून त्यात नोटाच नोटा सापडल्या आहेत. ५०० आणि २००० रुपयांच्या या नोटा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे. यादरम्यान बंगाल सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या विविध ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत. पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून २० कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्पिताच्या निवासी कंपाऊंडमधून ईडीला ही रक्कम मिळाली. ही रक्कम मोजण्यासाठी छापा टाकणारे पथक हे बँक कर्मचारी आणि मोजणी यंत्रांची मदत घेत आहे. याशिवाय अर्पिताच्या घरातून २० मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. इतके मोबाईल का वापरले गेले याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. खोलीत मोठ्या प्रमाणात ५०० आणि २००० च्या नोटा ठेवल्याचे फोटोत दिसत आहे.
याशिवाय या प्रकरणी कूचबिहार जिल्ह्यातील शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी यांच्या घराचीही ईडीचे कर्मचारी झडती घेत आहेत. एसएससी भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांची सीबीआयने चौकशी केली आहे. ईडीने आमदार माणिक भट्टाचार्य आणि इतरांच्या घरावरही छापे टाकले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board. pic.twitter.com/i4dP2SAeGG
— ED (@dir_ed) July 22, 2022
Enforcement Directorate West Bengal Search Operation ED Seized 20 Crore notes